चीनबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर फिलिपाईन्स ३२ ‘ब्लॅक हॉक’ हेलिकॉप्टर्स खरेदी करणार

‘ब्लॅक हॉक’मनिला/वॉर्सा – साऊथ चायना सीमधील चीनच्या वर्चस्ववादी कारवाया रोखण्यासाठी फिलिपाईन्सने आपल्या संरक्षणदलांच्या आधुनिकीकरणाला वेग दिला आहे. मंगळवारी फिलिपाईन्सने पोलंडबरोबर ३२ ‘ब्लॅक हॉक’ हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी करारावर स्वाक्षर्‍या केल्या. गेल्या चार महिन्यात फिलिपाईन्सकडून करण्यात आलेला हा तिसरा मोठा संरक्षण करार ठरला आहे. यापूर्वी फिलिपाईन्सने युद्धनौका व सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी करार केले आहेत.

फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री डेल्फिन लॉरेंझना व पोलंडमधील ‘पीझेडएल मिलिक’ या कंपनीचे प्रमुख जानुस्झ झाकेर्कि यांनी करारावर स्वाक्षर्‍या केल्या. ‘पीझेडएल मिलिक’ ही अमेरिकेतील आघाडीची शस्त्रास्त्रकंपनी ‘लॉकहिड मार्टिन’ची पोलंडमधील उपकंपनी आहे. करार सुमारे ६२.४ कोटी डॉलर्सचा असल्याची माहिती फिलिपिनी सूत्रांनी दिली.

फिलिपाईन्सने ‘ब्लॅक हॉक’ हेलिकॉप्टर्ससाठी केलेला तीन वर्षातील हा दुसरा करार आहे. यापूर्वी २०१९ साली १६ हेलिकॉप्टर्ससाठी करार करण्यात आला होता. या करारानुसार खरेदी करण्यात आलेली हेलिकॉप्टर्स सध्या फिलिपिनी हवाईदलात कार्यरत आहेत. नव्या करारानुसार, ३२ हेलिकॉप्टर्सचा पुरवठा पुढील वर्षापासून सुरू होणार असून २०२६ सालापर्यंत सर्व हेलिकॉप्टर्स फिलिपिनी हवाईदलात सामील झालेली असतील, असे फिलिपाईन्सकडून सांगण्यात आले आहे.

‘ब्लॅक हॉक’ हेलिकॉप्टर्सचा करार फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी २०१८ साली मंजूर केलेल्या संरक्षणदलाच्या आधुनिकीकरणाच्या मोहिमेचा भाग मानला जातो. चीनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर या कार्यक्रमाला मान्यता देण्यात आली होती. यानुसार २०१८ ते २०२२ या कालावधीत संरक्षणदलांच्या आधुनिकीकरणासाठी पाच अब्ज डॉलर्सचा निधी राखून ठेवण्यात आला होता.

‘ब्लॅक हॉक’या निधीतून फिलिपाईन्सच्या संरक्षणदलांसाठी नवी लढाऊ विमाने, युद्धनौका, पाणबुडी, विनाशिका, ड्रोन्स तसेच प्रगत क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. गेल्या चार महिन्यात फिलिपाईन्सने युद्धनौकांसाठी दक्षिण कोरियाबरोबर तर सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांसाठी भारताबरोबर करार केले आहेत. या करारांमागे चीनच्या साऊथ चायना सीमधील वाढत्या वर्चस्ववादी कारवाया हे प्रमुख कारण ठरले आहे.

चीन व फिलिपाईन्समध्ये साऊथ चायना सीच्या मुद्यावर असणारा वाद चांगलाच चिघळत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी चीन व आसियनमध्ये झालेल्या बैठकीतफिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुअर्ते यांनी चीनला खडसावले होते. फिलिपाईन्स सरकार व लष्कराकडून साऊथ चायना सी प्रकरणात सातत्याने आग्रही भूमिका घेऊन चीनला सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे.

काही महिन्यांपूर्वी फिलिपाईन्सने चीनकडून दरवर्षी लादण्यात येणारी मासेमारीवरील बंदी उघडपणे धुडकावली होती. त्यापाठोपाठ फिलिपाईन्सने साऊथ चायना सीमध्ये कृत्रिम बेटे तसेच ‘मिलिटरी हब’ उभारण्याच्या हालचालीही सुरू केल्या होत्या.

leave a reply