इराणबरोबरील नवा अणुकरार इस्रायलला धोक्यात टाकत आहे

- आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांचा दावा

अणुकरारजेरुसलेम – बायडेन प्रशासन इराणबरोबरचा अणुकरार पुढे रेटण्यासाठी घाई करीत आहे. यासंबंधीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यावर आणि महत्त्वाच्या वळणावर पोहोचल्याचा दावा बायडेन प्रशासन व इराणकडूनही केला जातो. अणुकरार टाळून आपण जुन्या चुकांची पुनरावृत्ती करू, असे सांगून बायडेन प्रशासन अणुकरारावर ठाम असल्याचे स्पष्ट संकेत देत आहे. हा अणुकरार इस्रायलची सुरक्षा धोक्यात टाकणारा असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक देत आहेत. या करारामुळे इराण अधिक बेलगाम होईल आणि बेछूटपणे वागेल, असे आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक बजावत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणचा अणुकार्यक्रम रोखण्यासाठी दीर्घकालीन आणि मजबूत कराराची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. असे दावे करून बायडेन प्रशासनाने व्हिएन्ना येथे इराणबरोबर आण्विक वाटाघाटी सुरू केल्या होत्या. पण गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या आणि बायडेन प्रशासनाकडून दिले जाणारे संकेत पाहता, नवा करार तकलादू आणि कमजोर असल्याची टीका इस्रायल व माध्यमे करीत आहेत.

इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट आणि माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू या दोघांनीही या होऊ घातलेल्या नव्या अणुकरारावर टीका केली आहे. हा अणुकरार इराणचा अणुकार्यक्रम अजिबात रोखू शकत नसल्याचा आरोप इस्रायली नेते करीत आहेत. सदर करार प्रत्यक्षात उतरला तर आखातात हिंसा माजून हे क्षेत्र अस्थिर बनेल, असा इशारा पंतप्रधान बेनेट यांनी दिला होता.

२०१५ सालच्या करारानंतर इराणने आपल्या अणुकार्यक्रमाचे तंत्रज्ञान प्रगत स्तरावर नेले आहे. त्यामुळे बायडेन प्रशासनाने इराणबरोबर नवा करार केला, तरीही या देशाच्या अणुकार्यक्रमांमध्ये काही बदल होणार नसल्याचे आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक बजावत आहेत. ही चिंता इस्रायलला सतावित असल्याचे या विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

अणुकरारनव्या कराराअंतर्गत इराणने आपल्याकडील संवर्धित युरेनियमचा पूर्ण साठा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हवाली करणार असल्याची हमी दिलेली नाही. तर या करारानंतर अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी निर्बंध शिथिल केल्याने इराणला मिळणारे आर्थिक सहाय्य हिजबुल्लाह, हमास आणि हौथी या दहशतवादी संघटनांसाठी वापरले जाण्याची शक्यता बळावली आहे. या करारानंतर इराणचा आत्मविश्वास अधिक बळावेल आणि इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी पासून या क्षेत्राला असलेला धोका अधिकच वाढेल असा इशारा, तेल अविव स्थित ‘इस्रायलज् इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडीज्’ या अभ्यास गटाचे विश्‍लेषक योएल गुहान्स्की यांनी दिला.

या करारामुळे इस्रायलला इराणविरोधात संरक्षण सज्जता आणि सहकार्य वाढविण्यासाठी अवधी मिळत असल्याचे गुहान्स्की यांनी लक्षात आणून दिले. इराणपासून आपल्या सुरक्षेला धोका वाटणार्‍या समविचारी अरब देशांबरोबर इस्रायलने सहकार्य वाढवावे, असे गुहान्स्की यांनी सुचविले. काही दिवसांपूर्वी बहारीनसोबत झालेला संरक्षण सहकार्य करार तसेच बाहरीनमधील नौदल सरावात इस्रायल आणि इतर अरब देशांची उपस्थिती या सहकार्याचे संकेत देणारी असल्याचे गुहान्स्की यांनी म्हटले आहे.

leave a reply