छत्तीसगडच्या दांतेवाडात आणखी १६ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

दांतेवाडा – छत्तीसगडच्या दांतेवाडात आणखी १६ माओवाद्यांनी सुरक्षादलांसमोर आत्मसमर्पण केले आहे. २६ जानेवारीलाही प्रजासत्ताक दिनी २४ माओवाद्यांनी शस्त्र खाली ठेवली होती. त्यानंतर आणखी १६ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने एकट्या दांतेवाडामध्ये या महिन्यात ‘लोन वरतु’ मोहिमेअंतर्गत आत्मसमर्पण करणार्‍या माओवाद्यांची संख्या ६२ च्या पुढे गेली आहे. यावरून या मोहिमेला जबरदस्त यश मिळत असल्याचे आणि माओवाद्यांचा प्रभाव दांतेवाडामधून कमी झाल्याचे अधोरेखित होत आहे. शनिवारी छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफ जवांनासमोर शस्त्रासह १६ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. हे सर्व माओवादी दांतेवाडातील बाचेली आणि किरंदूल जिल्ह्यात सक्रीय होते. यातील १४ जण हे माडकमीरस या एकाच गावातील होते. तसेच यातील दोन माओवाद्यांवर लाखाचे इनाम होते, अशी माहिती दांतेवाडाचे पोलीस अधिक्षक अभिषेक पाल्लवा यांनी दिली. माओवाद्यांचा पोकळ विचारसरणीने विटलेल्या आणि ‘लोन वरतु’ या मोहिमेमुळे प्रभावित झालेल्या या माओवाद्यांनी आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला, असे पाल्लवा म्हणाले.

शरण येऊ इच्छिणार्‍या माओवाद्यांसाठी गेल्यावर्षी ‘लोन वरतु’ अर्थात घराकडे परता ही मोहिम सुरू करण्यात आली होती. याला जबरदस्त प्रतिसाद मिळत नाही. मार्ग भरकटून आणि माओवाद्यांच्या चुकीच्या प्रचाराला बळी ठरून माओवादी संघटनांमध्ये सामील झालेल्यांना याद्वारे परतीचा मार्ग उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यांचे पुनर्वसन करण्यात येत असून त्यांना आर्थिक सहाय्यही दिले जात आहे. तसेच त्यांना रोजगारासाठी प्रशिक्षणही देण्यात येत आहे. याला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून गेल्यावर्षी जून महिन्यात मोहिम सुरू झाल्यापासून २८८ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

या महिन्यातच सुमारे ६२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. २६ जानेवारी रोजी १४ माओवादी शरण आले होते. तर १८ जानेवारी रोजी ८ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. यामध्ये ४ जणांवर मोठे इनाम होते. याशिवाय, ७ जानेवारी रोजी दांतेवाडातच १४ माओवाद्यांनी सुरक्षादलांसमोर शस्त्र खाली ठेवून मुख्य धारेत प्रवेश केला. छत्तीसगडच्या बिजापूर, तसेच बस्तर विभागातील इतर ठिकाणीही माओवादी शरण येत आहेत. बस्तर जिल्ह्यात गेल्यावर्षी चकमकीत ४० माओवादी ठार झाले होते, तर ४३८ माओवादी शरण आले होते. यावरून छत्तीसगडमध्ये सुरक्षादलांची कारवाई, विकासकामे आणि राबविण्यात येणारी पूनर्वसन मोहिम यामुळे माओवाद्यांचा प्रभाव कमी झाल्याचे स्पष्ट होते.

leave a reply