इराणबरोबरील अणुकरारावरील चर्चेत सौदीचा सहभाग हवा

- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन

पॅरिस/जेद्दाह – ‘२०१५ साली इराणबरोबर अणुकरार करताना झालेली चूक यापुढे होता कामा नये. इराणशी अणुकरारावर चर्चा करताना सौदी अरेबिया आणि या क्षेत्रातील आपल्या मित्रदेशांनाही यात सहभागी करून घ्यावे लागेल’, असे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी बजावले आहे. त्याचबरोबर इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी आपल्याकडे फारच कमी अवधी शिल्लक असल्याचा इशारा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी माध्यमांशी बोलताना, बायडेन प्रशासन आणि पाश्‍चिमात्य देशांवर दबाव वाढविणार्‍या इराणवर आपली प्रतिक्रिया नोंदविली. इराणचा अणुकार्यक्रम धोकादायक मार्गाने पुढे जात आहे. वेळीच रोखले नाही तर इराण अण्वस्त्रसज्जतेच्या जवळ पोहोचेल, याची जाणीव मॅक्रॉन यांनी करुन दिली.

२०१५ सालच्या अणुकराराचे उल्लंघन करणार्‍या इराणशी चर्चा करताना यापुढे अधिक कठोर भूमिका स्वीकारावी लागेल. तसेच या चर्चेमध्ये या क्षेत्रातील सौदी अरेबिया व इतर अरब मित्रदेशांनाही सहभागी करून घेणे भाग ठरेल, असे मॅक्रॉन यांनी बजावल्याची माहिती सौदीच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने दिली. पाच वर्षांपूर्वीच्या अणुकरारापासून सौदी व अरब देशांना बाजूला ठेवून अमेरिका व युरोपिय देशांनी मोठी चूक केल्याचे ताशेरे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ओढले.

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने इराणबरोबरील अणुकरारासाठी नियुक्त केलेले विशेषदूत रॉबर्ट मॅले यांनी फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनीच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली होती. त्यानंतर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणच्या अणुकार्यक्रमावरून बायडेन प्रशासनाला इशारा दिल्याचे दिसत आहे. अणुकरारावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मॅले यांची निवड केली, यावरून इस्रायल तसेच अरब माध्यमांनी टीका केली आहे.

२०१५ साली अमेरिकेने इराणबरोबर केलेल्या अणुकरारात मॅले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे मॅले हे इराणसमर्थक असल्याचा आरोप इस्रायली माध्यमे करीत आहेत. म्हणूनच मॅले यांनाच इराणबरोबर वाटाघाटीसाठी नियुक्त करून बायडेन प्रशासन पुन्हा इराणबाबत नरमाईचे धोरण स्वीकारणार असल्याचा दाट संशय इस्रायली माध्यमांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी यासंदर्भात दिलेला इशारा बायडेन प्रशासनाच्या चिंता वाढविणारा आहे. याआधी ब्रिटन व जर्मनी या देशांनीही इराण अणुकरारातील कलमांचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप केला होता.

leave a reply