चीनच्या बॉम्बर्सनी अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेवर हल्ल्याचा सराव केला होता

वॉशिंग्टन – तैवानच्या सागरी हद्दीतून प्रवास करणार्‍या अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेवर बॉम्बर तसेच लढाऊ विमानांनी हल्ल्याचा सराव केला होता. हा सराव सुरू असताना, अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका तैवानच्या आखातात गस्त घालत होती. त्यामुळे चीनच्या या सरावाचे गांभीर्य अनेकपटींनी वाढल्याचे दिसते. चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’च्या रेडिओ फ्रिक्वेन्सीतून याचा उलगडा झाला. ज्यो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तीन दिवसात हा प्रकार घडल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा लक्षात आणून देत आहेत.

गेल्या आठवड्यात शनिवार आणि रविवारी असे सलग दोन दिवस चीनच्या २८ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली होती. यामध्ये लढाऊ विमानांबरोबर युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली लांब पल्ल्याची विमाने तसेच बॉम्बर्सचाही समावेश होता. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने चीनच्या या घुसखोरीवर जोरदार टीका केली होती. चीनच्या विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत केलेल्या या घुसखोरीमुळे काही काळ या क्षेत्रात तणाव निर्माण झाला होता.

अमेरिका तसेच तैवानच्या माध्यमांमध्ये सध्या प्रसिद्ध होत असलेल्या माहितीनुसार, शनिवारी २३ जानेवारी रोजी चीनच्या विमानांचा हा सराव सुरू असताना अमेरिकेची ‘युएसएस थिओडोर रूझवेल्ट’ ही विमानवाहू युद्धनौकाही या क्षेत्रातून गस्त घालत होती. अमेरिकी युद्धनौका गस्त घालत असताना चीनच्या बॉम्बर्स विमानांनी सदर हवाई हद्दीतून प्रवास केला. त्याचबरोबर अमेरिकी युद्धनौकेवरील मॉक अटॅकचा सरावही केला. चिनी विमानांच्या रेडिओ संदेशातून ही तणाव वाढविणारी माहिती समोर आली आहे.

अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडने तैवानच्या हवाई हद्दीतील चीनच्या घुसखोरीवर याआधीच टीका केली आहे. तसेच तैवानच्या सुरक्षेसंदर्भात आपण वचनबद्ध असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे. यानंतर चीनच्या संरक्षण मंत्रालयाने स्वतंत्र तैवानसाठी सुरू असलेले प्रयत्न युद्धाची घोषणा असल्याची धमकी दिली होती.

दरम्यान, तैवानप्रकरणी आक्रमकता दाखवून चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग बायडेन प्रशासनावर दबाव वाढवित असल्याचा इशारा अमेरिकी विश्‍लेषक गॉर्डन चँग यांनी दिला आहे. चीनच्या आक्रमक कारवाया धोकादायक असल्याचेही चँग यांनी बजावले आहे.

leave a reply