देशात कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या १६६ वर

नवी दिल्ली – देशात कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या १६६ वर पोहोचली आहे. गेल्या चार दिवसातच देशात या साथीमुळे ८८ जण दगावले. चोवीस तासात १७  रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच चार दिवसात देशातील रुग्णांची संख्या तब्बल १६०० पेक्षा अधिकने वाढून ५, ७३४ वर पोहोचली आहे. शहरांमधून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली विशेष मंत्रिगटाची तातडीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला संरक्षणदल प्रमुख जनरल बिपीन रावतही उपस्थित होते. 

गुरुवारी सकाळपर्यंत देशातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या ५, ७३४ वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मात्र काही वृत्त अहवालानुसार या साथीत दगावलेल्यांची संख्या १७८ वर पोहोचली असून, रुग्णांची संख्या ५, ९१६ झाली आहे.  मुंबई, दिल्लीसारख्या महानगरे आणि इतर शहरी भागातून या साथीचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले  आहे. महाराष्ट्रात बुधवारी रात्रीपासून गुरुवारी दुपारपर्यंत सुमारे १२ तासात १६२ नवे रुग्ण आढळले. यामध्ये ९० टक्के नवे रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईत १४३, तर दिल्लीत ९३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे दिल्लीतील रुग्णांची संख्या  ६६९ वर पोहोचली आहे. गुजरातमध्ये ५५ नवे रुग्ण सापडले असून यातील ५० जण अहमदाबाद  शहरातील आहेत.

देशात या साथीच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष मंत्रिगटाची एक बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी सर्व  तयारीचा आढावा घेतला. देशात या साथीच्या रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालये आणि बेड्सची संख्या वाढविण्यावर, वैद्यकीय साहित्य व सुरक्षा उपकरणांच्या पुरविठ्यावर यावेळी चर्चा झाल्याचे   आरोग्य मंत्रालयाची माहिती संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली. तसेच कोरोनाचे  रुग्ण अधिक असलेल्या राज्यांमध्ये केंद्राने दहा वैद्यकीय पथके पाठवल्याची माहिती अग्रवाल म्हणाले.

देशात आतापर्यंत एक लाख २१ हजार जणांचे कोरोना टेस्टिंग झाली आहे. बुधवारी एका दिवसातच १३ हजार ३४५ जणांची चाचणी झाली. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल असोसिएशनच्या  (आयसीएमआर) १३९ प्रयोगशाळा आणि ६५ खाजगी प्रयोगशाळेत या चाचण्या होत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. अमेरिकेने भारताकडे हायड्रोक्सीक्लोरिक्विन औषधे मागविली होती. भारताने या औषधाच्या निर्यातीवर घातलेली बंदी काही अंशी हटवली होती. आता देशात आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात निर्माण होणारे हायड्रोक्सीक्लोरिक्विन निर्यात केले जाणार आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अग्रवाल यांनी देशात या औषधाचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट केले. 

दरम्यान आता पर्यंत १० राज्यांनी केंद्राकडे लॉकडाऊन कालावधी वाढ करण्याची मागणी केली आहे. तर काही राज्यांनी स्वतःचा लॉकडाऊन वाढविण्याचे संकेत दिले आहेत. गुरुवारी ओडिशा सरकारने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली. असे करणारे हे देशातील पहिले राज्य आहे. ओडिशात या साथीच्या रुग्णांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. मात्र खबरदारी म्हणून ओडिशा सरकारने हा निर्णय घेतला आहे.

leave a reply