देशातील १७० जिल्हे कोरोनाव्हायरसचे ‘हॉटस्पॉट’

- महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांचा समावेश

नवी दिल्ली – देशातील लॉकडाऊनचा दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच दिवशी देशातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. देशात या साथीत दगावलेल्यांची संख्या ३९२ वर, तर एकूण रुग्णांची संख्या सुमारे १२ हजारांवर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर देशात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा सरकार पूर्ण प्रयत्न करीत असून लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंगसिंग यासाठी महत्वाचे ठरेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे. तसेच या साथीला रोखण्यासाठी देशातील जिल्ह्यांची तीन श्रेणीत विभागणी करण्यात आली असून १७० जिल्हे रेड झोन मध्ये ठेवण्यात आल्याची माहितीही अग्रवाल यांनी दिली. यात महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांचा समावेश आहे.

मंगळवारपासून बुधवार सायंकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशात कोरोनाव्हायरसचे १११८ नवे रुग्ण आढळले. यामुळे देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या वाढून ११,९३३ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात बुधवारी दिवसभरात २३२ नव्या रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २,९१६ झाली आहे. यातील १९३६ रुग्ण मुंबईतच आढळले आहेत. बुधवारी दिवसभरात मुंबईत १८३ नवे रुग्ण सापडले. मुंबईत या साथीच्या रुग्णांची संख्या सतत वाढत असून बुधवारी या साथीसारखीच लक्षणे असलेले २६१ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या ५,३०० वर पोहोचली आहे.

महाराष्ट्राबरोबर सर्वधिक रुग्ण असलेली दिल्ली, तामिळनाडू ही राज्ये कोरोनाव्हायरसाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनली आहेत. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवालयांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेले जिल्हे, कोरोनारुग्ण आढळलेले पण हॉटस्पॉट नसलेले जिल्हे, आतापर्यंत या साथीचा एकही रुग्ण न सापडलेले जिल्हे अशी देशातील जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणाकडे अधिक लक्ष पुरवता येईल, असा तर्क त्यामागे आहे. देशात सध्या १७० जिल्हे या साथीचे हॉटस्पॉट बनले आहेत. या १७० पैकी १२३ जिल्ह्यात सर्वत्र सर्वत्र रुग्ण आढळत आहेत, तर ४७ जिल्ह्यात काही भागांमध्येच या साथीचे रुग्ण आढळत आहेत. हे १७० जिल्हे २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत, असे अग्रवाल यांनी सांगितले.

या हॉटस्पॉट असलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वधिक जिल्हे तामिळनाडूतील आहेत. या राज्यातील २२ जिल्हे कोरोनाव्हायरसच्या साथीचे हॉटस्पॉट ठरले आहेत. महाराष्ट्रातील १४ आणि आंध्र प्रदेश, राजस्थानातील प्रत्येकी ११ जिल्ह्यांचा हॉटस्पॉटमध्ये समावेश आहे. दिल्ली आणि उत्तरप्रदेशमधील प्रत्येकी ९, तेलंगणातील ८, केरळातील ६ जिल्ह्यांचा हॉटस्पॉटमध्ये समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली. हॉटस्पॉट नसलेल्या श्रेणीमध्ये २०७ जिल्हे असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

leave a reply