बोको हरामच्या हल्ल्यात चाड व नायजेरीयाचे १७० जवान ठार 

बोको हरामच्या हल्ल्यात चाड व नायजेरीयाचे १७० जवान ठार 
चाड आणि नायजेरीया या आफ्रिकी देशांच्या १७० जवानांचा बळी घेऊन ‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेने आफ्रिकेसह साऱ्या जगाला हादरा दिला. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचा दावा केला जातो. गेल्या काही आठवड्यांपासून चाड, नायजेरीया, नायजेर, कॅमेरून तसेच बुर्किना फासो, माली, मॉरिशियाना, सेनेगल या आफ्रिकेच्या साहेल भागातील देशांमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया तीव्र झाल्या असून यामुळे आफ्रिकन देशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

अल-कायदा आणि ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या बोको हरामने मंगळवारी चाड आणि नायजेरीयाला लक्ष्य केले. वेगवेगळ्या ठिकाणी भीषण हल्ले चढविले. चाडचे राष्ट्राध्यक्ष इद्रिस डेबी इट्नो यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोमा पेनिन्सूएला येथील लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. यावेळी चाडचे सैनिक आणि बोको हरामच्या दहशतवाद्यांमध्ये सुमारे सात तास संघर्ष सुरू होता. येथील सैनिकांच्या मदतीसाठी रवाना केलेल्या अतिरिक्त सैन्यपथकावरही दहशतवाद्यांनी हल्ले चढविले. हा हल्ल्यात आपण किमान शंभर सैनिक गमावल्याचे राष्ट्राध्यक्ष इद्रिस म्हणाले.

यानंतर पुढच्या काही तासात बोको हरामच्या दहशतवाद्यांनी नायजेरीयाच्या पूर्वेकडील बोर्नो प्रांतात घडविलेल्या स्फोटात ७० सैनिकांचा बळी गेल्याची माहिती, नायजेरीयन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन नेंचे यांनी दिली. नायजेरीयन सैनिकांचे पथक स्फोटके आणि शस्त्रसाठा घेऊन जात असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला चढविला. आठवड्याभरात नायजेरीयात झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला ठरतो.

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून खनिज संपत्तीने संपन्न असलेल्या साहेल देशांमधील दहशतवादी हल्ले वाढत चालले आहेत.

leave a reply