जी२० जागतिक अर्थव्यवस्थेत पाच ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार

नवी दिल्ली/रियाध  – गेल्या तीन महिन्यांपासून जगभरात थैमान घालणार्या आणि २२ हजार जणांचा बळी घेणार्या कोरोनाव्हायरसमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर निम्म्यावर येईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय संघटना देत आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्थेवर आलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी  ‘जी२०’ने पाच ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक जाहीर केली.

जगातील विकसित आणि विकसनशील देशांच्या ‘जी२०’ संघटनेची पहिली वर्चुयल बैठक गुरुवारी पार पडली. ही बैठक सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे होणार होती. पण या साथीच्या पार्श्वभूमीवर टेली-कॉन्फरन्सद्वारे ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोनाव्हायरसच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी संघटीत प्रयत्न करण्यावर एकमत झाले. तसेच जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यासाठी सुमारे पाच ट्रिलियन डॉलर्सचा निधी जमा करण्याचा निर्णय झाला.

तसेच या साथीने ग्रासलेल्या देशांसाठी आवश्यक वैद्यकीय साहित्यांची निर्मिती व पुरवठा हा मुद्दाही या चर्चेत होता. मात्र या साथीमुळे आलेल्या आर्थिक संकटाचा मुद्दा सदर चर्चेत अग्रस्थानी होता. कोरोनाव्हायरसमुळे एक तृतीयांश जग लॉकडाउनखाली आहे. जगभरातील उत्पादन थंडावले असून बाजारपेठाही ठप्प झाल्या आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिली तर जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर अर्ध्यावर येईल, असा इशारा ‘ऑर्गनायझेशन फॉर  इकोनॉमिक कोऑपरेशन अँड डेवलपमेंट’ने (ओइसीडी) दिला होता. या संकटातून बाहेर पडण्यासाठी बरीच वर्षे जावे लागतील, असे ‘ओइसीडी’ने बजावले होते. त्या पार्श्वभूमीवर जी२० ने हा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

leave a reply