गेल्या आर्थिक वर्षात भारताने 8.7 टक्के विकासदर गाठला

नवी दिल्ली – 2021-22 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेने 8.7 टक्के इतक्या विकासदराने प्रगती केली. कोरोनाच्या साथीमुळे 2020-21च्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.6 टक्क्यांनी घसरली होती. त्यानंतरच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेने केलेली ही कामगिरी उल्लेखनीय ठरते. 2021-22च्या चौथ्या तिमाहीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर युक्रेनच्या युद्धाचा प्रभाव पडल्याचेही समोर आले आहे.

gdpप्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी सर्वोत्तम असून सर्वाधिक विकासदराने भारत प्रगती करीतअसल्याचे समोर येत आहे. विशेषत: कोरोनाची साथ आलेली असताना भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या घसरणीचा सामना करावा लागला होता व त्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र पुढच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेची कामगिरी समाधानकारक असल्याचे दावे केले जात आहे. 8.7 च्या विकासदराने केलेली प्रगती इतर देशांच्या आर्थिक कामगिरीचा विचार करता सकारात्मक ठरते, असे बोलले जाते.

गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या व अखेरच तिमाहीवर युक्रेनच्या युद्धाचा प्रभाव पडला. यामुळे झालेली इंधन दरवाढ व त्यामुळे भडकलेली महागाई याचे परिणाम या तिमाहीवर झाले. तसेच जगातील काही देशांमध्ये आलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही प्रभाव अर्थकारणावर पडला होता. यामुळे चौथ्या तिमाहीतील विकासदर प्रभावित झाला. पण पुढच्या काळात या मर्यादा असताना देखील भारतीय अर्थव्यवस्था अधिक दमदार कामगिरी करून दाखविल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेनेही भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे. त्याचवेळी भारतीय अर्थतज्ज्ञ देखील अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करील, असा दावा करीत आहेत. परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात भारतातील गुंतवणूक काढून घेतल्याच्या बातम्या येत आहेत. पण नवी गुंतवणूक देशात येत असल्याचे गेल्या काही दिवसातील आकडेवारीवरून उघडझाले आहे.

leave a reply