कुर्ल्यामध्ये इमारत कोसळून 19 जणांचा बळी

-महापालिका तीन जीर्ण इमारती पाडणार

मुंबई – कुर्ल्यात चार मजली जीर्ण इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 19 जणांचा बळी गेला आहे, तर 13 जण जखमी झाले. पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यात घडलेली ही तिसरी इमारत दुर्घटना आहे. त्यामुळे मुंबईतील जीर्ण इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कुर्ल्यात कोसळलेल्या इमारतीच्या शेजारीच आणखीन तीन जीर्ण इमारती असून पालिकेने आता त्या पाडण्याचा निर्णय घेतला आहे.

Building collapse in Mumbaiकुर्ला पुर्वेला असलेल्या नाईक नगर सोसायटीमधील डी विंग ही इमारत सोमवारी मध्यरात्री कोसळली. यावेळी इमारतीमधील नागरिक साखर झोपेत होते. तसेच बाहेर जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे या संकटाची चाहूल सोसायटीच्या नागरिकांना लागली नाही. जोरदार आवाजामुळे या नाईक नगर सोसायटीमधील नागरिकांना जाग आली, त्यावेळी आपल्याच सोसायटीमधील डी विंग कोसळल्याचे त्यांच्या लक्षात आले. याची माहीती ताबडतोब अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमनदलाच्या डझनभर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, तसेच एनडीआरएफच्या दोन पथकांनाही पाचारण करण्यात आले.

ढिगाऱ्यांतून काही जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. मात्र 19 जणांचा बळी गेला. 13 जखमीपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या सोसायटीतील सर्व इमारतींना 2013 सालीच नोटीस बजवाण्यात आली होती. इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये इमारतीमध्ये दुरुस्ती काम करण्याची आवश्यकता असल्याचे बजावण्यात आले होते. पण कोणतीही देखभाल व दुरुस्ती त्यानंतरही करण्यात आली नाही. त्यामुळे नाईक नगर सोसायटीमधील सर्व इमारती आणखी जीर्ण झाल्या. इमारत आता दुरुस्तीयोग्यही उरली नसल्याचे 2016 साली पालिकेने स्पष्ट केले व ही इमारत धोकादायक बनली असून इमारत खाली करण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात आल्या.

मात्र नागरिकांनी इमारत रिकामी केली नाही. पालिकेने वारंवार सूचना केल्यावरही य इमारतींमध्ये नागरिक राहत होते. काही जणांनी आपण स्वत: धोका पत्करून येथे राहत आहोत, असे हमीपत्रही पालिकेला लिहून दिले होते, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली आहे. महापालिका आता पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये यासाठी या नाईक नगर सोसायटीमधील उर्वरीत ए, बी, सी या तिनही विंग पाडणार आहे, असेही पालिकेने म्हटले आहे.

पावसाळा सुरू झाल्यावर मुंबई, ठाणे या शहरांमध्ये जीर्ण झालेल्या इमारती किंवा त्याचा भाग कोसळल्याच्या काही बातम्या दरवर्षी धडकत असतात. यावर्षात पावसाने पूर्ण जोर पकडण्यापूर्वीच अशा तीन दुर्घटनांची नोंद झाली आहे. 23 जून रोजी चेंबूरमध्ये दुमजली औद्योगिक इमारत कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता, तर 10 जण जखमी झाले होते. याआधी 9 जून रोजी वांद्रे येथे तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतही एकाचा बळी गेला होता, तर 18 जण जखमी झाले होते. दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

leave a reply