सिरियातील अमेरिकेच्या कारवाईत अल कायदाचा वरिष्ठ कमांडर ठार

syria-us-yemeni-qaedaबैरुत – अमेरिकेने वायव्य सिरियामध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल कायदासंलग्न दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ कमांडर ठार झाला. या कारवाईमुळे सिरियातील अल कायदाच्या नेटवर्कला मोठा हादरा बसल्याचा दावा अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉन करीत आहे. सिरियातील अमेरिकेच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याची टीका मानवाधिकार संघटना गेल्या काही दिवसांपासून करीत आहे.

अल कायदासंलग्न ‘होरास अल-दीन’ या संघटनेचा वरिष्ठ कमांडर ‘अबू हमझा अल येमेनी’ हा सोमवारी सिरियाच्या इदलिब प्रांतात मोटारबाईकवरुन प्रवास करीत होता. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडला याची माहिती मिळताच इदलिबच्या हद्दीत ड्रोन रवाना करण्यात आले. या कारवाईत दोन रॉकेट्स डागून अमेरिकेने अबू हमझा अल येमेनी याला लक्ष्य केले. या हल्ल्यात अल कायदाचा कमांडर जागीच ठार झाला.

होरास अल-दीन ही संघटना अमेरिका व या क्षेत्रातील अमेरिकेच्या सहकारी देशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरते. त्यामुळे या संघटनेच्या वरिष्ठ कमांडरवरील कारवाई योग्य असल्याचा दावा अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड-सेंटकॉम’ने केला. अफगाणिस्ताननंतर सिरियाचे इदलिब म्हणजे अल कायदाच्या दहशतवाद्यांसाठी नंदनवन ठरत असल्याचा आरोप अमेरिका करीत आहे.

leave a reply