पंतप्रधान मोदी यांची युएईला भेट

अबू धाबी – जर्मनीत पार पडलेल्या जी7 परिषदेतील सहभागानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीला (युएई) भेट दिली. युएईचे राष्ट्राध्यक्ष ‘शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान’ यांनी अबू धाबीच्या विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी आपल्या चर्चेत भारत व युएईमधील धोरणात्मक भागीदारी अधिकच व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Modi-visit-UAE13 मे रोजी युएईचे राष्ट्रप्रमुख शेख खलिफा बिन झायद अल नह्यान यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर भारतानेही एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला होता. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी युएईला भेट देऊन भारताच्या संवेदना व्यक्त केल्या. त्यानंतर जी7 परिषदेत सहभागी होऊन जर्मनीतून मायदेशासाठी निघालेल्या पंतप्रधान मोदी यांनी युएईला भेट दिली. यावेळी शेख खलिफा बिन झायद अल नह्यान यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शेख खलिफा बिन झायद अल नह्यान यांच्याबद्दल प्रत्येकाला आदर वाटत होता आणि ते आपल्या जनतेच्या हितासाठी अथकपणे कार्यरत होते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

तर त्यांच्या निधानानंतर युएईची सत्तासूत्रे हाती आलेल्या ‘शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान’ यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. तसेच भारताच्या युएईबरोबरील संबंधांवर पंतप्रधान मोदी व ‘शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान’ यांच्यात सखोल चर्चा पार पडली. याआधी 18 फेब्रुवारी रोजी व्यापार, गुंतवणूक, अन्नसुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्यावर पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष ‘शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान’ यांच्यात व्हर्च्युअल माध्यमातून चर्चा पार पडली होती. व्यापार, गुंतवणूक, अन्नसुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य हे या चर्चेतील प्रमुख मुद्दे होते. यावेळी भारत व युएईमध्या मुक्त व्यापारी करार संपन्न झाला होता.

2021-22 या वित्तीय वर्षात भारत व युएईमधील द्विपक्षीय व्यापार 72 अब्ज डॉलर्सवर गेला होता. युएई हा भारताचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार देश आहे. तर भारत सर्वाधिक निर्यात करीत असलेल्या देशांच्या यादीत युएई दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुक्त व्यापारी करारानंतर पुढील पाच वर्षात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सवर जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. युएईबरोबरील सहकार्यामुळे आखाती क्षेत्रावरील भारताचा प्रभाव अधिकच वाढत असल्याची चिंता पाकिस्तानातील विश्लेषक व्यक्त करीत आहेत. विशेषतः जम्मू व काश्मीरमध्ये युएईने मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केल्यानंतर पाकिस्तान भारत व युएईमधील सहकार्याकडे अस्वस्थतेने पाहत आहे.

leave a reply