देशात एकाच दिवसात कोरोनाचे १९५ बळी आणि ३९०० नवे रुग्ण – रुग्णांची संख्या ४६,४३३ वर पोहोचली

नवी दिल्ली – देशात कोरोनाने एकाच दिवसात १९५ जणांचा बळी घेतला आहे. तसेच ३,९०० नवे रुग्ण देशभरात आढळले आहेत. चोवीस तासात बळी आणि रुग्णांच्या संख्येत झालेल्या या वाढीने परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. देशभरात कोरोनाव्हायरसच्या चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून त्यामुळे गेल्या चार दिवसापासून नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या आठवड्याभरात एकाच दिवसात कोरोनाचे सार्वधिक रुग्ण आढळण्याच्या बाबतीत आधीचे तीन उच्चांक मोडीत निघाले आहेत. याआधी रविवारी चोवीस तासात २,६६७ रुग्ण आढळले होते, तर शनिवारी २,५६७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती.

देशात कोरोनाव्हायरसच्या साथीने दगावलेल्यांची संख्या १,५६८ वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या ४६,४३३ वर गेली आहे. चोवीस तासात या साथीने १९५ जणांचा बळी घेतला आहे. महाराष्ट्रात ३५ जण दगावले, तर ७७१ नवे रुग्ण आढळले. यातील सर्वाधिक नवे रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईत या साथीने १८ जणांचा बळी घेतला असून ५१० नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात आतापर्यँत या साथीने ५८३ जणांचा बळी घेतला आहे, यातील ३६१ जण मुंबईतील होते. तसेच राज्यातील एकूण रुग्णांची संख्या वाढून १४,५४१ झाली आहे. मुंबईतच ९,१२३ रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील वाढते संक्रमण पाहता मुंबई पोलिसांनी शहारत १४४ कलम लागू करून जमावबंदी केली आहे. यानुसार शहरात चारपेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास मज्जाव आहे. तसेच सायंकाळी ८ ते सकाळी ७ पर्यंत वैद्यकीय वगळता अनावश्यक कारणांसाठी फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोरोना रुग्ण सापडल्याने प्रतिबंधित करण्यात आलेल्या भागात आता अधिक सक्तीने नियमांची अंमलबाजवणी करण्यात येत आहे.

महाराष्ट्रानंतर सर्वाधिक नवे तामिळनाडूत आढळले. या साथीचे ५२७ नवे रुग्ण सापडल्याने या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३,५५० वर पोहोचली आहे. गुजरात, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही एका दिवसात सर्वाधिक रुग्ण सापडल्याचा उच्चांक झाला आहे. गुजरातमध्ये ३७६ नवे रुग्ण आढळले असून या राज्यातील रुग्णांची संख्या सहा हजाराजवळ पोहोचली आहे. पश्चिम बंगालमध्ये ३९६ नवे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत आतपर्यंत ४,८५८, राजस्थानात ३,०६१, मध्य प्रदेशात २,९६१, उत्तरप्रदेशात २,७६६ रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान चाचण्यांमध्ये झालेल्या वाढीसह काही राज्यांनी रुग्णांची आणि बळींच्या संख्येची नोंद उशिराने दिल्याने एका दिवसात इतकी वाढ दिसून आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केले. पश्चिम बंगाल सरकारने तीन दिवस मृतांची संख्या जाहीर केली नव्हती, तर सोमवारी एकत्र माहिती जाहीर केला. यानुसार पश्चिम बंगालमध्ये ९८ जण दगावल्याची माहिती उघड झाली. या पार्श्वभूमीवर अग्रवाल बोलत होते. तसेच देशात १२,७२७ रुग्ण बरे झाले असून कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर २७.३७ टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहितीही अग्रवाल यांनी दिली.

leave a reply