इंधन दराच्या घसरणीचा भारताने पुरेपूर लाभ उचलला – इंधनाची साठवणूक करणाऱ्या रिफायनरी पूर्ण भरून घेतल्या

नवी दिल्ली – आंतराष्ट्रीय पातळीवर इंधन तेलाच्या घसरलेल्या किंमतीचा लाभ भारताने पुरेपूर उचलला आहे. भारतीय तेल कंपन्यांनी आपले सर्व तेल साठवणूक टाक्या पूर्ण भरल्या आहेत. सुमारे तीन कोटी २० लाख टन इतके इंधन साठवणूक टाक्या, पाईपलाईन आणि तेल साठवणूक जहाजांमध्ये भरून ठेवण्यात आल्याची माहिती, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. सध्या साठवण केलेल्या इंधन तेलातून देशाची २० टक्के स्थानिक मागणी भागवली जाऊ शकते, असे प्रधान यांनी म्हटले आहे.

कोरोनाव्हायरसमुळे घटलेल्या मागणीने आंतराष्ट्रीय बाजारात इंधन तेलच्या किंमती मोठ्या प्रमाणावर घसरलेल्या आहेत. इंधन तेलाच्या किंमतीत गेल्या दोन महिन्यात ६० टक्के घसरण झाली आहे, तर अमेरिकेच्या ‘वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट’ने इंधन दर शुन्याच्याही खाली गेल्याचे दर्शवले होते. भारत आपल्या मागणीच्या ८० टक्के इतके इंधन आयात करतो. या आयात इंधनासाठी अब्जावधी डॉलर्स भारताला खर्च करावे लागतात. मात्र इंधनतेलाच्या किंमतीत झालेल्या जबरदस्त घसरणीचा भारताने लाभ उचलला असून आपली सर्व साठवण केंद्र स्वस्त इंधनाने पूर्ण भरली आहेत.

केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीच याबाबत माहिती जाहीर केली. तीन कोटी २० लाख टन (३२ दशलक्ष) इंधन सध्या साठविण्यात आले आहे. ‘स्ट्रॅटेजिक’ तेल साठवणूक टाक्यांसह सरकारी कंपन्यांनी आपल्या इंधन साठवणूक टाक्या पूर्ण भरल्या आहेत. इतकंच नव्हे पाईपलाईन आणि इंधन साठवणूक जहाजेही पूर्ण भरल्याची माहिती पेट्रोलियममंत्री प्रधान यांनी दिली.

‘स्ट्रॅटेजिक’ तेल साठवणूक केंद्रामध्ये ५० लाख टन (५ कोटी बॅरल) इंधन तेल सध्या साठविण्यात आले आहे. ७० लाख टन इंधन तरंगत्या साठवणूक केंद्रात आणि दोन कोटी ५० लाख टन इंधनतेल पाईपलाईनमध्ये साठविण्यात आले आहे. भारतीय इंधन कंपन्या आपल्या तेलवाहू जहाजांमध्येही इंधन साठवून ठेवत आहेत. यामुळे देशाचे इंधन बिल कमी करण्यास मदत मिळणार असून देशाचे अब्जावधी डॉलर्स वाचणार आहे, असे प्रधान म्हणाले. गेल्याच आठवड्यात एका वृत्त अहवालात भारताने आपल्या ९५ टक्के तेल टाक्या भरल्याचा दावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर प्रधान यांनी ही माहिती दिली आहे.

सध्या देशात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. यामध्ये काही भागात सरकारने उद्योगांना आणि वाहनांना सूट दिली आहेत. १७ मे नंतर आर्थिक उलाढाल आणखी वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात इंधन उत्पादनाच्या स्थानिक मागणी सुमारे ७० टक्क्याने घटली होती. मात्र लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी मागणीत १५ टक्के वाढ झाली. त्यामुळे १७ मे नंतर इंधन तेल व पेट्रोलियम उत्पादनांची स्थानिक मागणी वाढेल, अशी अशा प्रधान यांनी व्यक्त केली.

इंधन तेलाच्या किमतीत होणारी घसरण रोखण्यासाठी इंधन निर्यातदार देशांनी तेल उत्पादनात विक्रमी कपात केली आहे. मात्र मागणीत इतकी प्रचंड घट झाली आहे कि उत्पदनात कपातीतून फारसा फरक पडणार नाही, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. एका अहवालानुसार तीन कोटी बॅरल प्रतिदिन इतकी मागणी घटली आहे. यामुळे येत्या काळात भारत या स्थितीचा आणखी लाभ उचलेल अशी अपेक्षा विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

leave a reply