जम्मू-कश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार; चार दहशतवाद्यांना अटक

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील खूड-हांजिपोरा भागात सुरक्षादलांनी चकमकीत ‘आयएसजेके’च्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. तर रविवारी रात्री बडगाम भागात सुरक्षादलांच्या संयुक्त कारवाईत लश्कर-ए-तोयबाच्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. यानंतर जम्मू-काश्मीरमधील कुलगाम आणि शोपियानाची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

सोमवारी खूड-हांजिपोरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलासह जम्मू-काश्मीरचे पोलिस गावात दाखल झाले. इथल्या एका घरामधून दहशतवाद्यांनी सुरक्षादलांच्या जवानांवर गोळीबार सुरु केला. त्याला चोख प्रत्युत्तर देताना जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. या ठिकाणाहून मोठा शास्त्रसाथ जप्त करण्यात आला आहे. अजून या गावात काही दहशतवादी लपल्याचा संशय व्यक्त केला जातो. त्यामुळे येथे शोध मोहीम सुरु आहे. आदिल मोहंमद वाणी उर्फ अबू इब्राहिम आणि शाहीन बशीर ठोकेर अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दोघे ‘इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू ॲण्ड काश्मीर (आयएसजेके) या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

याआधी रविवारी देखील जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाला लश्कर-ए-तोयबाच्या चार दहशतवाद्यांना पकडण्यात यश मिळाले होते. वसिम गनी, फारूख अहमद डार, मोहम्मद यासीन आणि अझहरूद्दीन मीर अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे चार दहशतवादी लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना आश्रय, त्यांच्या खानपानाची व्यवस्था तसेच इथल्या स्थानिक तरूणांना दहशतवादी संघटनेत भरती करण्याचे काम करीत होते. या चौघांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या चौघांच्या अटकेमुळे बडगाम जिल्ह्यात लश्कर-ए-तोयबा आणि इतर दहशतवादी संघटनेविषयी अधिक माहिती मिळेल असा दावा जम्मू-काश्मीर पोलिसांनी केला आहे.

leave a reply