‘ओआयसी’मध्ये भारताला पाठिंबा देऊन सौदी-यूएईची पाकिस्तानला चपराक

दुबई – भारतावर इस्लामफोबियाचा आरोप करणारा पाकिस्तान चांगलाच तोंडघशी पडला आहे. इस्लामिक देशांची संघटना ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’मध्ये (ओआयसी) भारताच्या विरोधात अपप्रचाराची पाकिस्तानची मोहीम या संघटनेच्या प्रमुख सदस्य देशांनीच हाणून पाडली. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमीरात (यूएई) या दोन प्रमुख सदस्य देशांनी ‘ओआयसी’मध्ये भारताची बाजू घेतली. याआधी मालदीव या भारताच्या शेजारी देशाने या संघटनेत भारताचे जोरदार समर्थन केले होते.

भारत इस्लामफोबियाला खतपाणी घालत आहे. भारत जम्मू-काश्मीरमध्ये अत्याचार करीत आहे, असा आरोप संयुक्त राष्ट्रसंघातील पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी केला होता. याद्वारे इस्लामी देशांचे समर्थन मिळवून ‘ओआयसी’मध्ये भारताची कोंडी करण्याचा पाकिस्तानचा डाव होता. यासाठी पाकिस्तानने अरब देशांमधील विश्लेषकांना पैसे चारल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. ‘ओआयसी’मध्ये भारताविरोधात ठराव पारित करून संयुक्त राष्ट्रसंघात त्याचा शस्त्रासारखा वापर करण्याचा पाकिस्तानचा डाव होता. पण पाकिस्तानच्या या प्रयत्नांना ‘ओआयसी’मध्येच हादरा बसला.

सर्वात आधी मालदिवने पाकिस्तानचे आरोप फेटाळले. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश असून, या देशात वीस कोटीहून अधिक इस्लामधर्मीय असल्याचे मालदिवने म्हटले होते. भारतावर असा आरोप करणे या क्षेत्रातील धार्मिक एकतेसाठी घातक ठरेल, असेही मालदिवने बजावले होते. तर पाकिस्तानने आपल्या भारतविरोधी भूमिकेत बदल करावा आणि या क्षेत्रातील देशांना सोबत घेऊन काम करावे, असा टोलाही मालदीवने लगावला होता. याला काही तास उलटत नाही तोच, सौदी अरेबिया आणि युएई’ने मालदीवच्या या भूमिकेचे समर्थन केल्याचे दिसत आहे. तसेच ओमानने देखील भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करणे चुकीचे ठरेल असे सांगून, पाकिस्तानला चपराक लगावली आहे.

याआधी पाकिस्तानच्या बाजूने भारताविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारणाऱ्या मलेशियाच्या भूमिकेतही बदल झाल्याचे ‘ओआयसी’च्या या बैठकीत स्पष्ट झाले आहे. काही महिन्यांपूर्वी, पाकिस्तान, तुर्की आणि मलेशिया या त्रिकुटाने मिळून भारताच्या विरोधात जोरदार कॅम्पेन सुरू केले होते. ‘सौदी-यूएई’चा प्रभाव असलेल्या ‘ओआयसी’ला आव्हान देण्यासाठी मलेशियाने स्वतंत्र बैठकही आयोजित केली होती. यांनतर भारताचे मलेशियाबरोबरील संबंध ताणले गेले होते. पण आता मलेशियात सरकार बदलले असून या नव्या सरकारने भारताबरोबरील संबंध पुर्ववत करण्यासाठी योग्य दिशेने पावले टाकली आहेत. ‘ओआयसी’च्या बैठकीत भारताला अनुकूल भूमिका घेऊन भारताला आणखी एक सकारात्मक संदेश दिला आहे.

दरम्यान, या बैठकीत ‘यूएई’ने भारताची बाजू घेऊन पाकिस्तानचा भ्रमनिरास केला आहे. याआधी यूएई’च्या राजघराण्यातील काहीजणांनी भारताच्या विरोधात विधाने केली होती. त्याला अतिरंजित प्रसिद्धी देऊन पाकिस्तानच्या माध्यमांनी युएई भारताच्या विरोधात गेल्याचे दावे ठोकून दिले होते. यूएई’च्या पाठोपाठ इतर आखाती देशदेखील भारताच्या विरोधात जातील आणि आखाती देशांमध्ये काम करीत असलेल्या लाखो भारतीयांना इथून परत पाठविले जाईल, अशी दिवास्वप्ने पाकिस्तानी विश्लेषक पाहत होते. मात्र यूएई’ने ‘ओआयसी’मध्ये भारताची बाजू घेऊन पाकिस्तानला वास्तवाची जाणीव करून दिली आहे.

leave a reply