अरुणाचल प्रदेशमध्ये सामरिकदृष्ट्या महत्वाच्या दोन पुलाची उभारणी

नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेशच्या तवांग आणि पश्चिम कामेंग जिल्ह्यात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (बीआरओ) सामरिकदृष्ट्या महत्वाच्या दोन पुलांची उभारणी केली आहे. मागील काही दिवसात भारत चीन सीमेवरील चीनच्या वाढत्या कुरापती पाहता सीमेवर तातडीने सैन्य तैनातीसह वेगवान हालचालीच्या दृष्टीने हे पूल महत्वाचे ठरतील असा दावा केला जातो.

‘बीआरओ’कडून तवांग जिल्ह्यात ‘तवांग चू’ नदी पूल उभारण्यात आला आहे. या पुलाची लांबी ५० मीटर आहे. तर पश्चिम कामेंग जिल्ह्यात उभारण्यात आलेला सुखा नाला पूल हा ४५ मीटर लांबीचा आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. मॅकमोहन लाइनजवळ तातडीने सैन्य तैनातीसाठी या पूलामुळे मदत मिळेल असे मुख्यमंत्री खांडू यावेळी म्हणाले. देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी हे पूल महत्वाचे ठरतील, मात्र त्याचबरोबर या पुलांमुळे या भागात रोजगारही उपलब्ध होतील, असे सांगून मुख्यमंत्री खांडू यांनी “बीआरओ’च्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

चीन अरुणाचल प्रदेशावर आपला दावा सांगतो व या भागात चीनकडून सतत घुसखोरीची प्रयत्न होत असतात. अरुणाचल परदेशाला लागून असलेल्या आपल्या भागात चीनने मोठ्या प्रमाणावर पायभूत सुविधा विकसित केल्या आहेत. त्यामुळे संघर्ष काळात चीनला भारतीय सीमेपर्यंत आपल्या जवानांना वेगाने रसद पुरविता येईल. यापार्श्वभूमीवर भारतानेही गेल्या काही वर्षांपासून सीमेवर पायाभूत सुविधांना विकासाला गती दिली आहे. सीमा सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी भारताकडून ही पावले उचलण्यात येत आहेत. या दृष्टीने बीआरओने बांधलेले पूल सीमेनजीक काम सुरु असलेल्या महत्वाच्या प्रकल्पांपैकी एक ठरतात.

महिन्याभरापूर्वी “बीआरओ’ने अरुणाचल प्रदेशच्या सुबानसिरी जिल्ह्यातील सुबानसिरी नदीवर ४६० फूट लांबीचा “बॅली ब्रीज ‘ अवघ्या २७ दिवसात बांधून पूर्ण केला होता. चोवीस तास काम करून “बीआरओ’च्या जवानांनी अत्यंत कमी वेळेत उभारलेल्या या पूलामुळेही अवजड लष्करी वाहनांना कमी वेळात चीन सीमेपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. त्यानंतर आता आणखी दोन पुलांचे काम पूर्ण करून चीन सीमेवर भारताने आपण विकास कामाचा वेग वाढविल्याचे संकेत दिले आहेत.

leave a reply