अमेरिकेतील हिंसाचाराच्या घटनांमध्ये 72 तासांमध्ये 22 जणांचा बळी

वॉशिंग्टन – अमेरिकेत शुक्रवार 13 मे ते रविवार 15 मे या 72 तासांच्या अवधीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये सुमारे 22 जणांचा बळी गेला आहे. न्यूयॉर्क, शिकागो, ह्युस्टन, पेनसिल्व्हेनिया, कॅलिफोर्निया, नॉर्थ कॅरोलिना व विस्कॉन्सिन या भागांमध्ये हिंसाचाराच्या दहापेक्षा अधिक घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील पोलीस अधिकारी व विश्लेषकांनी अमेरिकेत हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ दिसून येईल, असा इशारा दिला होता.

शनिवारी दुपारी न्यूयॉर्क शहरातील सुपरमार्केटमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेत 10 जणांचा बळी गेला असून तीन जण जखमी झाले होते. ही 72 तासांमधील हिंसाचाराची सर्वात मोठी घटना ठरली आहे. या घटनेमागे वर्णद्वेष हे कारण समोर आले असून पेटन जेन्ड्रॉन या 18 वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याची मानसिक स्थिती योग्य नसल्याचे तपासातून समोर आले.

त्यापूर्वी विस्कॉन्सिन प्रांतात झालेल्या तीन वेगवेगळ्या गोळीबाराच्या घटनांमध्ये तीनजणांचा बळी गेला. यात एका 17 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. शिकागो शहरात शुक्रवारी तसेच शनिवारी घडलेल्या हिंसक घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून यात 16 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. रविवारी ह्युस्टनमधील बाजारपेठेत झालेल्या गोळीबारात दोघांचा बळी गेल्याची माहिती स्थानिक सुरक्षायंत्रणांनी दिली. कॅलिफोर्नियात प्रार्थनास्थळावर झालेल्या हल्ल्यात एकाचा बळी गेला असून पाच जण जखमी झाले आहेत.

गेल्या काही वर्षात अमेरिकी पोलीसदलाकडून झालेल्या कृष्णवर्णियांच्या हत्यांनंतर या समाजातून पोलीसदलाविरोधात मोठ्या प्रमाणावर असंतोष व्यक्त झाला होता. ‘ब्लॅक लाईव्हज्‌‍ मॅटर’ व इतर आंदोलनांमधून पोलीसदलाचा निधी कमी करण्याची तसेच पोलीस हटविण्याची आक्रमक मागणी करण्यात आली होती. शिकागोसारख्या अनेक शहरांनी पोलीसदलाचा निधी कमी करण्याचे निर्णयही घेतले होते. या निर्णर्यांमुळे पोलीसांची संख्या घटली असून त्यांच्या क्षमता तसेच अधिकारांवरही मर्यादा आल्या आहेत.

याचा परिणाम अमेरिकी शहरांच्या सुरक्षेवर होत असून प्रमुख शहरांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरात गस्त घालण्यासह इतर महत्त्वाच्या कामांसाठी पोलीस कमी पडत असल्याने टोळीयुद्ध व इतर हिंसक घटना वाढल्याचे सांगण्यात येते. फिलाडेल्फिया व शिकागोसह 13 प्रमुख शहरांमध्ये गेल्या वर्षी विक्रमी प्रमाणात हिंसक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. अमेरिकेत सर्वाधिक लोकसंख्या असणारे तिसरे शहर म्हणून ओळख असणाऱ्या शिकागोमध्ये 2021 साली सुमारे 800 हत्या व साडेतीन हजारांहून अधिक शूटिंगच्या घटनांची नोंद झाली होती.

2021 साली अमेरिकेत ‘जुलै4 वीकेन्ड’ला झालेल्या हिंसाचार व गोळीबाराच्या घटनांमध्ये सुमारे 150 जणांचा बळी गेला होता.

leave a reply