एससीओची बैठक सुरू असताना किरगिझिस्तान-ताजिकिस्तानमधील संघर्षात 24 ठार

Kyrgyzstan-Tajikistan border mapबिश्केक – किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तान या दोन सोव्हिएत देशांच्या सीमेवर पेटलेल्या संघर्षात 24 जणांचा बळी गेला तर 87 जण जखमी झाले. बळींमध्ये नागरिकांचा मोठा समावेश असल्याची चिंता व्यक्त केली जाते. यासाठी दोन्ही देशांनी परस्परांवर आरोप केले आहेत. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या उपस्थितीत, उझबेकिस्तानच्या समरकंद येथे ‘एससीओ’ची बैठक सुरू असताना माजी सोव्हिएत देशांमध्ये हा संघर्ष पेटला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माजी सोव्हिएत देशांमध्ये अचानक संघर्ष पेटून या क्षेत्रात अस्थैर्य निर्माण झाल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दोन दिवसांपूर्वी किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तानच्या सीमेवर संघर्ष पेटला होता. यामध्ये एका जवानाचा बळी गेला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्षबंदी लागू करण्यात आली होती. पण शुक्रवारी ही संघर्षबंदी मोडून दोन्ही देशांच्या लष्करामध्ये आणखी मोठा संघर्ष भडकला. ताजिकिस्तानच्या लष्कराने किरगिझिस्तानच्या बातकेन भागात केलेल्या हल्ल्यांमध्ये 24 जणांचा बळी गेला. या संघर्षात लढाऊ विमाने, रॉकेट लाँचर्स, तोफांचा वापर करण्यात आला.

Kyrgyzstan-Tajikistan conflictयामध्ये बातकेन भागातील घरे आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती किरगिझिस्तानच्या लष्कराने दिली. तसेच दोन्ही देशांच्या सीमेवरील चौक्या उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला जातो. नागरिकांचा बळी घेणाऱ्या या संघर्षासाठी दोन्ही देश परस्परांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. या संघर्षानंतर दोन्ही देशांनी सीमेवर वसलेल्या गावांना रिकामे करून स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.

गेल्या वर्षी देखील किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तानच्या सीमेवर असाच संघर्ष पेटला होता. त्या संघर्षात 50 जणांचा बळी गेला होता. पण यावेळचा संघर्ष इथेच संपणारा नसून आणखी भडकणार असल्याचा दावा केला जातो. दोन्ही सोव्हिएत देशांमधील पाणीवाटपाचा मुद्दा अजूनही धगधगत असल्याचे गेल्या दोन दिवसांमधील संघर्षातून समोर आले आहे. हा प्रश्न सुटल्याशिवाय किरगिझिस्तान-ताजिकिस्तानातील संघर्ष संपुष्टात येणार नसल्याचे दिसत आहे.

तीस वर्षांपूर्वी सोव्हिएत रशियाचा भाग असणाऱ्या किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तानचे राष्ट्रप्रमुख ‘एससीओ’च्या बैठकीसाठी उझबेकिस्तानमध्ये असताना हा संघर्ष पेटला आहे. उझबेकिस्तानच्या समरकंद येथे ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओ’ची बैठक पार पडली. शुक्रवारी किरगिझिस्तानचे राष्ट्राध्यक्ष सादीर जापारोव्ह आणि ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमली राहमोन यांच्यात भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सीमावाद, पाणीवाटपाचा मुद्दा चर्चा झाल्याचे किरगिझिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या संकेतस्थळाने स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून माजी सोव्हिएत देशांमध्ये संघर्ष भडकला आहे. समरकंद येथील बैठक सुरू होण्याआधी आर्मेनिया आणि अझरबैझान यांच्यात युद्ध पेटले होते. रशियाने मध्यस्थी करून हा संघर्ष थांबविला नाही तोच किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये संघर्ष भडकला. आर्मेनियाबरोबर रशियाचे लष्करी सहकार्य आहे. तर किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये रशियाचे लष्करी तळ आहेत. रशिया युक्रेनमधील संघर्षातून माघार घेत असताना मध्य आशियाई देशांमध्ये पेटलेला हा संघर्ष आणि त्यामुळे निर्माण झालेले अस्थैर्य रशियाच्या सीमेसाठी आव्हान ठरू शकते, असा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत.

leave a reply