सिरियन विमानतळावरील इस्रायलच्या हल्ल्यात पाच जवान ठार

-सिरियन वृत्तवाहिनीचा आरोप

israel jet 1बैरूत/दमास्कस – इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियाच्या दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळावर चढविलेल्या हल्ल्यांमध्ये पाच जवान मारले गेल्याचा आरोप सिरियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने केला. पण या हल्ल्यांमध्ये सिरियन जवानांबरोबर इराणसमर्थक गटाचे सदस्यही ठार झाल्याचा दावा ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने केला. सिरियातील अस्साद राजवटीबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या गाझापट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेने सिरियातील हवाई हल्ल्यांसाठी इस्रायलवर टीका केली.

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सिरियन राजधानी दमास्कसच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आसपासच्या भागात जोरदार हवाई हल्ले झाले. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हे हल्ले चढविल्याचा ठपका सिरियन वृत्तवाहिनीने ठेवला. इस्रायलच्या या हल्ल्यांमध्ये आम्ही पाच जवान गमावल्याचा आरोप या वृत्तवाहिनीने केला. पण इतर माध्यमांनी इस्रायलच्या लेक तिबेरियास भागातून दमास्कसवर रॉकेट हल्ले झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सिरियन वृत्तवाहिनीच्या आरोपांकडे संशयाने पाहिले जात आहे.

पण ब्रिटनस्थित सिरियन मानवाधिकार संघटनेने केलेल्या दाव्यानुसार, सिरियन विमानतळ आणि दक्षिण दमास्कसच्या भागात हवाई हल्ले झाले. यामध्ये पाच सिरियन जवान आणि इराणसंलग्न संघटनेचे दोन दहशतवादी देखील मारले गेले. त्यामुळे पुन्हा एकदा सिरियातील इराण व इराणसंलग्न दहशतवादी गटांच्या तळांना इस्रायलने लक्ष्य केल्याचे दिसत आहे. गेल्या तीन आठवड्यांमध्ये राजधानी दमास्कसच्या विमानतळावर झालेला हा दुसरा हल्ला ठरतो. तर सिरियातील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हा चौथा हल्ला असल्याचे निरिक्षक लक्षात आणून देत आहेत.

syria map1गेल्या महिन्याच्या अखेरीस दमास्कस विमानतळ तसेच अलेप्पो येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर इस्रायलचे हवाई हल्ले चढविल्याचा दावा केला जातो. गेल्या तीन आठवड्यात अलेप्पो विमानतळावर दोन वेळा हल्ले झाले आहेत. या तीनही हल्ल्यानंतर सदर विमानतळ काही दिवसांसाठी बंद करण्यात आले होते. तर या हल्ल्यांमध्ये विमानतळावरील धावपट्टी तसेच इराणसंलग्न ठिकाणांना लक्ष्य केल्याचे उघड झाले होते.

इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स आणि कुद्स फोर्सेसचे जवान सिरियात तळ ठोकून असल्याचा आरोप इस्रायलने केला होता. त्याचबरोबर लेबेनॉनमधील हिजबुल्लाह आणि सिरिया-इराकमधील दहशतवादी गटांना एकत्र आणून इराणने आपल्याविरोधात मोठी आघाडी तयार केल्याची टीका इस्रायलने केली होती. सिरियातील अस्थैर्याचा फायदा घेऊन इराण इस्रायलवर हल्ल्याची तयारी करीत असल्याचा ठपका इस्रायलने ठेवला होता. यासाठी इराण प्रवासी विमानांचा वापर करून सिरियात शस्त्रतस्करी करीत असल्याचे इस्रायलने म्हटले होते. सिरियातील इराण व इराणसंलग्न गटांनी माघार घेतली नाही तर आपले हल्ले सुरू राहतील, असा इशारा इस्रायलने दिला होता.

दरम्यान, सिरियामधील काही भागातून इराणच्या जवानांनी तसेच हिजबुल्लाह आणि इराणसंलग्न संघटनेच्या दहशतवाद्यांनी माघार घेण्यास सुरुवात केली आहे. हमा प्रांतातून ही माघार सुरू असल्याची बातमी सौदी अरेबियाची मालकी असलेल्या वर्तमानपत्राने इस्रायली लष्कराच्या हवाल्याने प्रसिद्ध केली. या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

leave a reply