26/11 च्या हल्ल्यातील ‘लश्कर’चा हॅण्डलर साजिद मीरला चीनने संयुक्त राष्ट्रसंघात कारवाईपासून वाचविले

संयुक्त राष्ट्रसंघ – चीनने आणखी एक पाकिस्तानी दहशतवाद्याला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ म्हणून घोषित करण्याच्या प्र्रस्ताव रोखला आहे. 26/11 च्या प्रमुख सूत्रधारांपैकी एक असलेला, तसेच अमेरिका, फ्रान्स व ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ल्याचा कट आखणाऱ्या ‘लश्कर-ए-तोयबा’चा कुख्यात दहशतवादी साजिद मीर याला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षापरिषदेत ठेवण्यात आला होता. भारत, अमेरिकेने ठेवलेल्या प्रस्तावाला तांत्रिक कारण देत चीनने विरोध केला. चीनकडून संयुक्त राष्ट्रसंघात अशा प्रस्तावात अडथळे आणण्याची ही पहिली वेळ नसून याआधी अनेक वेळा असे प्रस्ताव चीनने रोखले आहेत व पाकिस्तानची मदत केली आहे. गेल्या चार महिन्यातच अशाच प्रकारचे तीन निरनिराळ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधातील कारवाई चीनने रोखली आहे.

Sajid Mirसाजिद मीर 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार आहे. भारतात हल्ला घडविण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांचा मीर हा हॅण्डलर होता. या हल्ल्याच्या तयारीत त्याची मुख्य भूमिका होती. याआधीही त्याने अनेक घातपाती कारवाया घडविल्या होत्या. मात्र 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मीरवरील कारवाईसाठी पाकिस्तानवर दबाव वाढला होता. अमेरिकेने 2012 साली मीरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. त्यानंतर मीर अचानक गायब झाला. पाकिस्तानने तो मृत झाल्याचेही घोषित केले होते. मात्र भारतीय यंत्रणा साजिद जिवंत असल्याचे दावे करीत होत्या.

भारताच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला वाचविण्यासाठी पाकिस्तानाने तो मेला असल्याचा बहाणा केला असला, तरी ‘फायनान्शियल ॲक्शन टाक्स फोर्स’च्या (एफएटीएफ) ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी अखेर याच वर्षी जून महिन्यात पाकिस्तानने साजिद मीरचे भूत बाहेर काढले होते. तो जिवंत असल्याचे मान्य करीत त्याची अटकही दाखविली. तसेच दहशतवाद्यांना पैशाच्या पुरवठा करण्यासंदर्भात पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने 15 वर्षांची शिक्षाही ठोठावली. मात्र सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या साजिद मिरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यापासून रोखण्याचे पाकिस्तान व चीनचे प्रयत्न अनेक प्रश्न उपस्थित करतात. तो खरेच पाकिस्तामधील तुरुंगात आहे की त्याला वाचविण्यासाठी या शिक्षेच्या आडून त्याला सेफहाऊस देण्यात आले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मीरच्या शिरावर 50 लाख डॉलर्सचे इनाम अमेरिकी यंत्रणांनी ठेवलेले आहे. अशा दहशतवाद्याला चीन पाकिस्तानच्या सांगण्यावरुन वाचवत असल्याचे आरोप होत आहे.

कुख्यात दहशतवाद्यांविरोधात संयुक्त राष्ट्रसंघाच्या कारवाईत दिरंगाई करण्यासाठी बाधा आणण्याची चीनची ही पहिलीच वेळ नाही. लश्करचा प्रमुख हाफिज सईद, तसेच जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर यांच्यावरील कारवाईही चीनने अशाच प्रकारे अनेक वेळा रोखली होती. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असलेला दवाब व टीकेनंतर चीनने या दोघांवरील कारवाईतील बाधा हटविली. या दोघांशिवाय अनेक दहशतवादी संघटना व दहशतवाद्यांवरील कारवाईला चीनने वेळोवेळी विरोध केला आहे.

गेल्या महिन्यातच जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख व मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझ्ाहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहरविरोधात संयुक्त राष्ट्रसंघातील प्रस्तावही चीनने रोखला होता. तर जून महिन्यात ‘लश्कर’चा म्होरक्या हाफीज सईदचा भाऊ रहमान मक्की याच्यावरील कारवाईही चीनने रोखली होती.

leave a reply