मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर बंडखोरांचा भ्याड हल्ला

- आसाम रायफल्सच्या कमांडिंग अधिकार्‍यासह सात शहीद

नवी दिल्ली/इंफाळ  – लष्कराच्या ‘४६ आसाम रायफल्स’च्या ताफ्यावर शनिवारी सकाळी मणिपूरमध्ये बंडखोरांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात कमांडिंग ऑफिसर, त्याची पत्नी, मुलगा आणि चार जवान शहीद झाले. तसेच तीन जवान जखमी आहेत. २०१५ सालानंतर मणिपूरमध्ये बंडखोरांनी केलेला हा सर्वात मोठा हल्ला ठरतो. या हल्ल्यामागे ‘पीपल्स रिव्होल्युशनरी पार्टी ऑफ कंगलिपक’ (पीआरईपीएके) या संघटनेचा हात असल्याचे समोर येत आहे. यानंतर या भागात मोठी मोहीम हाती घेण्यात आली असून बंडखोरांशी चकमक सुरू असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यावर तीव्र दु:ख व्यक्त करून या शहिदांचे बलिदान विस्मृतीत जाणार नाही, असा संदेश दिला आहे. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या हल्ल्यामागे असलेल्यांना त्यांच्या कृत्याचे परिणाम भोगावे लागतील, असे बजावले आहे.

‘४६ आसाम रायफल्स’चा ताफा चुराचंदपूर जिल्ह्यातील सेहकन गावाजवळ आला असताना बंडखोरांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला व त्यानंतर बेछूट गोळीबारास सुरूवात केली. यामध्ये आसाम रायफल्सच्या ‘क्विक रिस्पॉन्स टीम’चे (क्यूआरटी) कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांच्यासह तीन जवान जागीच शहीद झाले. सीआरपीएफच्या वाहनात कर्नल विप्लव त्रिपाठी यांची पत्नी व सहा वर्षाचा मुलगाही होता. त्यांचाही या हल्ल्यात बळी केला. तर आणखी एक जवानाला रुग्णालयात नेत असताना वीरमरण आले. तीन जवान जखमी झाले आहेत.

या ठिकाणी चकमक अजूनही सुरू असल्याच्या बातम्या होत्या. या ठिकाणी अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली असून संपूर्ण भागाला घेरण्यात आले आहे. तसेच मोठी शोधमोहिम हाती घेण्यात आली असून दोघा बंडखोरांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शहीद कर्नल विप्लव त्रिपाठी हे जुलै महिन्यापर्यंत मिझोराममध्ये तैनात होते. तीन महिन्यांपूर्वीच त्यांची चुराचंदपूरमध्ये तैनाती करण्यात आली होती. मिझोराममध्ये तैनात असताना त्यांच्या नेतृत्त्वाखाली मोठी ऑपरेशन्स राबविण्यात आली होती. बेकायदा तस्करीला आळा घालण्यासाठी त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. विविध मोहिमांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त केला होता.

दरम्यान, या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. २०१५ साली मणिपूरच्या चांडेल जिल्ह्यात ‘युनायटेड लिब्रेशन फ्रन्ट ऑफ वेस्टर्न साऊथ ईस्ट एशिया’ या संघटनेने भारतीय लष्कराच्या ताफ्यावर असाच भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्याच्या आठवणी या निमित्ताने ताज्या झाल्या. २०१५ सालच्या हल्ल्यात २० जवान शहीद झाले होते. तर १५ जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केली व दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. आताही सरकार मोठी कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांची प्रतिक्रिया याचे संकेत देत आहेत. चारच दिवसांपूर्वी आसाम रायफल्सच्या जवानांनी मणिपूरमध्ये म्यानमार सीमेनजीक २०० आयईडी जप्त केले होते. या आयईडीमुळे प्रचंड मोठा घातपात घडविता आला असता. मात्र आसाम रायफल्सच्या कारवाईमुळे हा घातपाताचा कट उधळला गेला. मणिपूरच नव्हे संपूर्ण ईशान्य भारतात हिंसेचा मार्ग न सोडलेल्या बंडखोरांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे.

गेल्यावर्षी लोकशाहीवादी सरकार उलथून चीनधर्जिण्या लष्कराने म्यानमारमध्ये सत्ता हाती घेतली होती. त्यानंतर म्यानमारच्या सीमेवर शस्त्रास्त्रे, अमली पदार्थांची तस्करी आणि भारतविरोधी कारवाया वाढल्याचे पहायला मिळत आहे. ईशान्य भारतातील उल्फासह सर्वच प्रमुख बंडखोरी संघटना सरकारबरोबर शांतीचर्चेत सहभागी झाल्या आहेत. मात्र काही संघटनांनी शस्त्र खाली ठेवण्यास नकार दिला आहे. चुराचंदपूरमधील हल्ल्यानंतर त्यांच्यावर कारवाई अधिक तीव्र केली जाईल. त्याचवेळी म्यानमारमधल्या लष्करी राजवटीचा भारतविरोधी कारवायांना असलेला छुपा पाठिंबा ही भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक बाब बनल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

leave a reply