तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून पाकिस्तानात २७ मोठे दहशतवादी हल्ले

दहशतवादी हल्लेपेशावर – अफगाणिस्तानात तालिबानची राजवट प्रस्थापित झाल्यानंतर पाकिस्तानने जल्लोष केला होता. पण याची जबर किंमत पाकिस्तानला चुकवावी लागत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये पाकिस्तानात २७ मोठे दहशतवादी हल्ले झाले असून यात ५८ जणांचा बळी गेला आहे. यात पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेच्या जवानांचा समावेश आहे. अफगाणिस्तानच्या सीमेवर तैनात असलेल्या पाकिस्तानी जवानांवरील हल्ल्यांमध्येही वाढ झाली आहे. शनिवारी अफगाण सीमेजवळ झालेल्या हल्ल्यात दोन पाकिस्तानी जवान मारले गेले.

पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील दाता खेल भागात अफगाण सीमेजवळील चौकीवर तैनात पाकिस्तानी जवानांवर शनिवारी गोळीबार झाला. पाकिस्तानी लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात दोन जवान मारले गेले. अद्याप कुठल्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

याआधी अफगाणिस्तानच्या सीमेजवळ पाकिस्तानी जवानांवर झालेल्या हल्ल्यांसाठी ‘तेहरिक-ए-तालिबान’वर पाकिस्तानने आरोप केले होते. पण ९ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘तेहरिक-ए-तालिबान’ या दहशतवादी संघटनेबरोबर संघर्षबंदी केली. याचे तपशील किंवा तेहरिकच्या मागण्यांची माहिती दहशतवादी हल्लेपाकिस्तान सरकारने जाहीर करण्याचे टाळले होते. यामुळे पंतप्रधान इम्रान यांच्या सरकारवर जोरदार टीका झाली होती.

या संघर्षबंदीनंतर या महिन्याभरात पाकिस्तानी जवानांवर झालेला हा तिसरा हल्ला ठरतो. यामुळे पाकिस्तान सरकारवर माध्यमांमधून होणारी टीकेची धार वाढली आहे. अशा परिस्थितीत एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, तालिबानने अफगाणिस्तानची सूत्रे हाती घेतल्यापासून पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. यामागे तेहरिक-ए-तालिबानमधील टोळ्या, आयएस-खोरासन, बलोच लिबरेशन फ्रंट हे गट असल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

अफगाणिस्तानचा वापर करून भारत पाकिस्तानात दहशतवादी कारवाया करीत असल्याचा आरोप पाकिस्तान करीत होता. यासाठी अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासांचा वापर केला जातो, असे पाकिस्तानचे म्हणणे होते. पण आता अफगाणिस्तानातील भारतीय दूतावास बंद झाले असून तरीही पाकिस्तानात होणार्‍या दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. ही बाब पाकिस्तानचे भारतावरील आरोप निराधार असल्याचे सिद्ध करते. याकडे लक्ष वेधून भारतीय विश्‍लेषक पाकिस्तानचा पर्दाफाश करीत आहेत.

leave a reply