कतार एनर्जी आणि सिनोपेक यांच्यात २७ वर्षांचा करार

- कतार चीनला दीर्घकाळासाठी गॅस पुरवठा करणार

दोहा/बीजिंग – आखाती देशांनी चीनबरोबर सहकार्य प्रस्थापित केले तर त्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, असे सांगून अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने आखाती देशांना धमकावले होते. याला काही दिवस उलटत नाही तोच, चीन आणि कतारमध्ये गॅस पुरवठ्यासंदर्भात मोठा करार पार पडला आहे. ‘कतार एनर्जी’ ही कंपनी चीनला तब्बल पुढील २७ वर्षांसाठी गॅस पुरवठा करणार असल्याची घोषणा कतारच्या इंधनमंत्र्यांनी केली. रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोपिय देश इंधनसंकटाचा सामना करीत असताना चीन व कतारमधील सदर करार लक्ष वेधून घेत आहे.

या करारानुसार ‘कतार एनर्जी’ कंपनीच्या ‘नॉर्थ फिल्ड ईस्ट-एनएफई’ प्रकल्पातून दरवर्षी ४० लाख टन नैसर्गिक वायू अर्थात गॅसचा पुरवठा चीनच्या ‘चायना पेट्रोलियम ॲण्ड केमिकल कॉर्पोरेशन-सिनोपॅक’ कंपनीला केला जाईल. पुढील २७ वर्षांसाठी कतारकडून चीनला हा गॅस पुरवठा सुरू राहणार असून आत्तापर्यंतचा हा सर्वात दीर्घकालिन करार असल्याचा दावा कतारचे सरकार करीत आहे. एनएफई हे जगातील सर्वात मोठे नैसर्गिक वायूचा साठा असलेले क्षेत्र आहे. यातील काही भागावर इराणचादेखील अधिकार आहे.

एनएफईच्या शोधानंतर कतारच्या नैसर्गिक वायूच्या साठ्यात मोठी वाढ झाली असून २०२७ सालापर्यंत कतार या क्षेत्रातून प्रतिवर्ष १२ कोटी टनहून अधिक साठा उपसणार आहे. याच प्रकल्पातून गॅस पुरवठा मिळविणारा चीन हा पहिला देश ठरला आहे. या क्षेत्रातून उपसला जाणारा सर्व साठा आपल्याला मिळावा, यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत. पण पाश्चिमात्य कंपन्यांची कतारच्या या प्रकल्पात गुंतवणूक आहे. त्यामुळे सदर प्रकल्प मिळविण्यासाठी चीनसमोर पाश्चिमात्य देशांचे आव्हान असल्याचा दावा केला जातो.

आत्तापर्यंत चीन, जपान व दक्षिण कोरिया हे कतारकडून नैसर्गिक वायूची आयात करणाऱ्या देशांमध्ये आघाडीवर होते. यापैकी चीनने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या नैसर्गिक वायूच्या साठ्यात वाढ करण्यास सुरुवात केल्याचा दावा केला जातो. पण आशियाई देशांप्रमाणे आता युरोपिय देशदेखील कतारबरोबर असा करार करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत.

चीनप्रमाणे युरोपमधील इतर कंपन्यादेखील कतारकडून नैसर्गिक वायूची आयात करण्यासंदर्भात चर्चा करीत आहेत. रशिया-युक्रेन युद्ध भडकल्यापासून युरोपिय देश इंधनाच्या संकटाला सामोरे जात आहेत. युरोपमधील इंधनाचे दर कडाडले असून अशीच परिस्थिती कायम राहिल्यास युरोपमध्ये विजेचे संकट निर्माण होईल व त्याच्याशी संबंधित उद्योगक्षेत्राला याचा फटका बसेल, असा इशारा दिला जात आहे. युरोप देखील कतारकडून दीर्घकाळासाठी गॅस पुरवठा सुरू करण्याबाबत गांभीर्याने विचार करीत आहे.

leave a reply