भारतीय लष्कर पीओकेचा ताबा घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज

पूंछ – पाकिस्तानव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचे आदेश केंद्र सरकारकडून मिळाले, तर त्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे, असे लष्कराच्या नॉर्दर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जाहीर केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काही दिवसांपूर्वी भारताच्या विकासाची यात्रा पाकिस्तानव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानपर्यंत पोहोचल्याखेरीज पूर्ण होणार नाही, असे म्हटले होते. त्याचा दाखला देऊन पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना लेफ्टनंट जनरल द्विवेदी बोलत होते. गेल्या काही महिन्यांपासून भारत पीओकेवरील पाकिस्तानच्या अवैध ताब्याचा मुद्दा उपस्थित करीत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी तर पीओके व गिलगिट-बाल्टिस्तानच्या सहभागाखेरीज भारताच्या विकासाची यात्र पूर्ण होऊच शकत नाही, असे म्हटले होते. इतकेच नाही तर पीओके व गिलगिट-बाल्टिस्तानमधील भारतीय जनतेवर पाकिस्तान करीत असलेल्या अत्याचारांची किंमत चुकती करावी लागेल, असा इशारा संरक्षणमंत्र्यांनी दिला होता. पाकिस्तानच्या माध्यमांनी त्याची गंभीर दखल घेऊन भारत पीओके ताब्यात घेण्यासाठी हल्ले चढविण्याची तयारी करीत असल्याचे दावे केले होते.

त्या पार्श्वभूमीवर, लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी पीओके ताब्यात घेण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगून पाकिस्तानची धडधड वाढविली. मात्र संरक्षणमंत्र्यांनी जे काही सांगितले, त्यात नवे काही नसून देशाच्या संसदेनेच पीओकेसह गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताचाच भूभाग असल्याचा ठराव मंजूर केलेला आहे, याकडे लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी लक्ष वेधले. त्यामुळे भारतीय लष्कराने आपल्याच देशाचा भूभाग परत मिळविण्यासाठी कारवाई केली, तर ते दुसऱ्या देशावरील आक्रमण ठरत नाही, असे संकेत लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिले आहेत.

काश्मीर खोऱ्यात अजूनही तीनशेहून अधिक दहशतवादी आहेत व यातील ८२ पाकिस्तानातून आलेले आहेत. तर स्थानिकांची संख्या ५३वर आहे. बाकीच्या १७० जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. पण या सर्वांना हालचालींची संधीच मिळणार नाही, अशारितीने जम्मू व काश्मीरमध्ये सुरक्षा दलांचे काम सुरू आहे.

दहशतवादी कारवायांवर नियंत्रण मिळविण्यात लष्कराला यश मिळालेले आहे. यानंतर पाकिस्तानने आपले डावपेच बदललेले आहेत, याकडे नॉर्दर्न कमांडच्या प्रमुखांन लक्ष वेधले. सध्या पाकिस्तान मोठ्या शस्त्रांऐवजी पिस्तूल, ग्रेनेडस्‌‍ आणि अमली पदार्थांची तस्करी करून सर्वसामान्य जनतेला लक्ष्य करीत आहे, याकडे लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी लक्ष वेधले. पुढच्या काळात जम्मू व काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झालाच, तर भारत व पाकिस्तानमध्ये युद्ध पेट घेईल, असा इशारा अमेरिकेच्या अभ्यासगटांनी याआधीच दिला होता. भारत युद्धसज्ज बनला असून कुठल्याही क्षणी पीओकेसह गिलगिट-बाल्टिस्तान ताब्यात घेईल, अशी चर्चा पाकिस्तानात सुरू झालेली आहे. नॉर्दर्न कमांडचेच माजी प्रमुख असलेले केजेएस ढिल्लॉन यांना सोशल मीडियावर पीओकेमधील एकाने प्रश्न विचारला होता. भारताने पाकिस्तानकडून हा भूभाग परत मिळवलाच, तर इथल्या जनतेला इथेच राहण्याची परवानगी भारत देईल, की त्यांना पाकिस्तानात जावे लागेल? अशी विचारणा या इसमाने केली होती.

पीओके व गिलगिट-बाल्टिस्तानकडे पाकिस्तान शक्य तितके दुर्लक्ष करीत असल्याची खंत इथले स्थानिक व नेते देखील करू लागले आहेत. गेल्या सात दशकाहून अधिक काळ पाकिस्तानने या भागाच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि त्याचे भयंकर परिणाम इथल्या जनतेला सहन करावे लागत आहे. त्याचवेळी पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांच्या वावरामुळे हा भाग अधिकच असुरक्षित बनल्याची तक्रार स्थानिक करीत असून आता निदर्शनांद्वारे जनता आपला संताप व्यक्त करीत आहे.

अशा परिस्थितीत, भारताचे नेते व लष्करी अधिकारी पीओके व गिलगिट-बाल्टिस्तानबाबत करीत असलेली विधाने लक्ष वेधून घेणारी ठरतात.

leave a reply