अमेरिकेत गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसचे २७५१ बळी

वॉशिंग्टन – कोरोनाव्हायरसच्या साथीने अमेरिकेत माजविलेल्या हाहाकारात ४४,८४५ जणांचा बळी गेला असून गेल्या चोवीस तासात अमेरिकेत या साथीने २,७५१ जण दगावले आहेत. पुढच्या काळात अमेरिकेतील या साथीच्या बळींची संख्या अधिक वाढेल, असा इशारा अमेरिकेच्या ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशन’ (सिडीसी) या गटाने दिला. जगभरातील या साथीच्या रुग्णांची वाढती संख्या देखील चिंतेचा विषय ठरत आहे.

या साथीने जगभरात १,८०,५७८ जणांचा बळी घेतला असून जवळपास २६ लाख जणांना या साथीची लागण झाली आहे. जगभरात झालेल्या एकूण जीवितहानीपैकी २५ टक्के बळी अमेरिकेत गेले आहेत. गेल्या चोवीस तासात अमेरिकेत २७५१ जणांचा बळी गेला असून यात न्यूयॉर्क प्रांतातील सुमारे ४७४ जणांचा समावेश आहे. तर गेल्या काही दिवसांपासून या साथीमुळे दगावलेल्या वृद्धाश्रमातील नागरिकांचाही समावेश एका दिवसातील मृत्यूसंख्येत केला गेला आहे.

ब्रिटनमध्ये या साथीमुळे गेल्या चोवीस तासात ७६३ जणांचा बळी गेला असून या देशातील एकूण बळींची संख्या १८ हजारांवर गेली आहे. जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधील १,३३,४९५ जणांना या साथीची लागण झाली आहे. आपल्या देशातील कोरोनाची साथ शिखरावर असल्याचा इशारा ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी दिला.

दरम्यान, गेल्या चोवीस तासात या साथीने स्पेनमध्ये ४३५ तर इटलीमध्ये ४१२ जण दगावले आहेत. युरोपातील या साथीच्या बळींची संख्या एक लाख नऊ हजारांवर पोहोचली आहे. लॅटीन अमेरिकेत या साथीचे ४,३५८ बळी गेले असून एकट्या ब्राझिलमध्ये २,७६९ जण दगावले आहेत. लॅटीन अमेरिकेतील या साथीच्या रुग्णांची संख्या ९२ हजारांवर गेली आहे. तर आफ्रिकेत या साथीने १,२०६ जणांचा बळी घेतला आहे.

leave a reply