भारताने मुजीबूर रहमान यांच्या मारेकऱ्याला बांगलादेशकडे सोपविले

भारताने मुजीबूर रहमान यांच्या मारेकऱ्याला बांगलादेशकडे सोपविले

ढाका – बांगलादेशचे संस्थापक व माजी पंतप्रधान मुजीबुर रहमान यांच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या रिसालदार मोसलेहुद्दीन खान याला भारताने बांगलादेशच्या हवाली केले आहे. रिसालदार याला पश्चिम बंगालमधून ताब्यात घेण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच बांगलादेशने वंगबंधू मुजिबुर रहमान यांच्या मारेकर्‍यांपैकी एक असलेल्या अब्दुल माजीद याला फासावर लटकवले होते. माजीद गेली पंचवीस वर्षे कोलकात्यात लपून बसला होता.

सोमवारी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी रिसालदार मोसलेहुद्दीन खान याला बांगलादेशच्या सुरक्षा यंत्रणांकडे सोपविले. मुजीबूर रहमान यांच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या बारा जणांना २००९ साली बांगलादेश न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. यातले सहा आरोपी फरार घोषित करण्यात आले होते. यात रिसालदार खान याचाही समावेश होता.

रिसालदार बांगलादेशातून पळून भारतात दाखल झाला आणि पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्यातील बोनगावात औषधांचे दुकान चालवित होता. इथूनच भारतीय यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले होते. काही महिन्यांपूर्वी कोलकातामधून बांगलादेशमध्ये आलेल्या अब्दुल माजीद याला बांगलादेशच्या सुरक्षा यंत्रणानी पकडले होते. त्यानंतर त्याच्या चौकशीत माजिदने रिसालदार याच्याबद्दलची माहिती दिली होती.

leave a reply