कोरोनाव्हायरस – केंद्रीय मंत्रिमंडळाकडून १५ हजार कोटींचा तातडीचा निधी मंजूर

नवी दिल्ली – देशात कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या ६५२ वर, तर एकूण रुग्णांची संख्या २१००० वर पोहोचली आहे. बुधवारी महाराष्ट्रात ४३१ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या वाढून ५,६४९ वर गेली आहे. मुंबईतच ३०९ नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ३,७५४ वर पोहोचली आहे. कोरोनाच्या साथीच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये केंद्र सरकारकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेसाठी आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी १५ हजार कोटी रुपयांचा तातडीचा निधी मंजूर करण्यात आला. ही साथ नियंत्रणात आणणे, या साथीचे निदान आणि उपचारांशी निगडित सुविधा विकसित करून आपत्कालीन प्रतिसादाची क्षमता विकसित करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे.

देशात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या १४०० ने वाढून २०४७१ वर पोहोचल्याचे आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. मात्र यामध्ये बुधवारी दिसभरात विविध राज्यांमध्ये आढळलेल्या नव्या रुग्णांची संख्या समाविष्ट नाही. महाराष्ट्रात बुधवारी ४३१ नवे रुग्ण आढळले, दिल्लीत ८९, तामिळनाडूत ३३, राजस्थान १५३, उत्तर प्रदेशात ११२, गुजरातमध्ये १३२, पश्चिम बंगालमध्ये ३२ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या २१ हजाराच्या पुढे गेली आहे.

देशात गेल्या आठवड्यापासून दरदिवशी १२०० ते १५०० नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे देशातील या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. सरकारने चाचण्यांमध्येही वाढ केली आहे. त्यामुळे नवे रुग्ण सापडण्याचा वेग वाढला आहे, असे सांगितले जाते. चाचण्या वाढविण्यासाठी रॅपिड टेस्टिंग सुरु करण्यात आली होती. मात्र चीनमधून मागविण्यात आलेले हे रॅपिड टेस्टिंग किट्स सदोष निघाल्याने या चाचण्या तात्पुरत्या थांबविण्यात आल्या. त्यामुळे बुधवारी देशभरात एकूण चाचण्यांची संख्या घटली आहे. चीनने यावर प्रतिक्रिया देताना सदोष किट्स बाबत भारताला सहकार्य करू असे म्हटले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या साथीचा सामना करण्यासाठी, तसेच भविष्यात अशा संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याकरिता केंद्र सरकारने १५००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातील ७,७७४ कोटी रुपये आपत्कालीन प्रतिसादासाठी यंत्रणा आणि सुविधा विकसित करण्याकरिता तातडीचा निधी म्हणून मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय भविष्यात अशाच प्रकारच्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रयोगशाळा उभारणे, जैव सुरक्षेच्या दृष्टीने सज्जता, महामारी संदर्भातील संशोधन यासाठी इतर निधी खर्च केला जाणार आहे.

leave a reply