चीनच्या 29 लढाऊ विमानांची तैवानच्या हद्दीत घुसखोरी

-तैवानने क्षेपणास्त्र यंत्रणा कार्यान्वित केली

taiwan-xi-jinpingतैपेई – चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स’च्या 29 लढाऊ आणि बॉम्बर विमानांनी मंगळवारी तैवानच्या हवाईहद्दीतून गस्त घातली. चीनच्या या अरेरावीला उत्तर देण्यासाठी तैवानने देखील आपली लढाऊ विमाने रवाना केली. त्याचबरोबर क्षेपणास्त्र यंत्रणा कार्यान्वित करून चिनी विमानांचा माग काढला. गेल्या काही महिन्यांमध्ये चिनी विमानांच्या घुसखोरीविरोधात तैवानने क्षेपणास्त्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची ही दुसरी वेळ ठरते.

काही दिवसांपूर्वी चीनच्या लष्कर व नौदलाने तैवानच्या किनारपट्टीजवळ बेटदेश ताब्यात घेण्याचा मोठा सराव आयोजित केला होता. याद्वारे चीनने तैवानला तसेच तैवानला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेला संकेत दिले होते. त्यानंतर चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंगहे यांनी शांग्री-ला बैठकीच्या निमित्ताने, तैवानच्या स्वातंत्र्याविरोधात चीन अखेरपर्यंत संघर्ष करीत राहील, असा इशारा दिला होता. स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या तैवानमधील नेत्यांना अमेरिकेने पाठिंबा देऊ नये, असे स्पष्ट शब्दात चीनने बजावले होते. तसेच तैवानचे आखात हा आपल्या सागरी हद्दीचा भाग असल्याचा दावा चीनने केला होता.

taiwan-china-incursion-mapतैवानच्या सरकारने चीनचे हे दावे फेटाळले होते. तसेच चीनविरोधी संघर्षासाठी आपण तयार असल्याची घोषणा तैवानने केली होती. तर तैवानचे आखात आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग असल्याचे सांगून तैवानने सागरीक्षेत्रावर दावा करणाऱ्या चीनला फटकारले होते. अमेरिकेने देखील तैवानच्या भूमिकेचे समर्थन केले होते. यामुळे खवळलेल्या चीनने दोन दिवसांपूर्वी क्षेपणास्त्रभेदी इंटरसेप्टरची चाचणी केली. ही चाचणी तैवानसाठी इशारा असल्याचा दावा चिनी माध्यमांनी केला होता.

याला काही तास उलटत नाही तोच, चीनच्या 29 विमानांनी मंगळवारी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली. गेल्या सहा महिन्यात चीनच्या विमानांनी तैवानच्या हद्दीत एवढ्या मोठ्या घुसखोरी करण्याची ही तिसरी वेळ ठरते. पण यावेळी तैवानने चिनी विमानांना पिटाळण्यासाठी लढाऊ विमाने धाडण्याबरोबरच क्षेपणास्त्र यंत्रणाही कार्यान्वित केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते. चीनच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी आपण तयार असल्याचे संकेत तैवानने यातून दिल्याचे दिसत आहे.

leave a reply