चीनच्या 30 लढाऊ विमानांची तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी

- तैवानने चीनच्या विमानांना पिटाळले

तैपेई – चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या 30 लढाऊ विमानांनी सोमवारी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केली. आपल्या ‘एअर डिफेन्स झोन’ मध्ये प्रवेश केलेल्या चीनच्या विमानांना पिटाळण्यासाठी तैवानने आपली लढाऊ विमाने रवाना केली. यामुळे काही तास तैवानच्या हवाई क्षेत्रात तणाव निर्माण झाला होता. चीनच्या या घुसखोरीला चोवीस तास उलटत नाही तोच, अमेरिकेच्या वरिष्ठ सिनेटर्सनी तैवानला भेट दिली. यानंतर अमेरिकेचे नॅशनल गार्ड आणि तैवानच्या लष्करात सहकार्य प्रस्थापित करण्यावर अमेरिकी प्रशासन विचार करीत असल्याची घोषणा तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई ईंग-वेन यांनी केली.

china-taiwan-incursionचीनच्या कम्युनिस्ट राजवटीने तैवानवर हल्ल्याची तयारी केली आहे. रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्याप्रमाणे चीनने तैवानवर हल्ला चढविणार आहे. चीनच्या कम्युनिस्ट पार्टी आणि पिपल्स लिबरेशन आर्मीच्या बैठकीतील ऑडिओ टेप गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाली होती. यासाठी चीन शेकडो विमाने आणि जहाजांचा वापर करणार आहे. तैवानच्या हवाईहद्दीत लढाऊ आणि बॉम्बर विमाने रवाना करून चीन तैवानच्या सज्जतेचा आढावा घेत आहे.

सोमवारी चीनच्या 30 विमानांनी तैवानच्या ‘एअर डिफेन्स झोन’ मध्ये केलेली घुसखोरी देखील याचाच एक भाग ठरते. यामध्ये चीनच्या 20 लढाऊ विमानांचा समावेश होता. चीनच्या या अरेरावीला उत्तर देण्यासाठी तैवानने आपली लढाऊ विमाने रवाना केली. तसेच हवाई सुरक्षा यंत्रणा देखील कार्यान्वित केली. यानंतर चीनची विमाने तैवानच्या हद्दीतून माघारी परतली. अशाप्रकारे घुसखोरी करून चीन या क्षेत्रातील तणाव वाढवित असल्याचा आरोप अमेरिकेने गेल्याच आठवड्यात केला होता.

चीनच्या विमानांनी तैवानमध्ये केलेल्या घुसखोरीला चोवीस तास पूर्ण होत नाही तोच, अमेरिकेच्या सिनेटर टॅमी डकवर्थ मंगळवारी तैवानमध्ये दाखल झाल्या. त्यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई ईंग-वेन यांची भेट घेतली. यावेळी अमेरिका आणि तैवानमध्ये आर्थिक, राजकीयआणि सुरक्षेच्या आघाडीवर सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा पार पडली.

डकवर्थ यांच्या भेटीनंतर तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई यांनी अमेरिका आणि तैवानमधील नव्या सहकार्याचे संकेत दिले. अमेरिकेचे नॅशनल गार्ड आणि तैवानचे लष्कर यांच्यात लवकरच सहकार्य प्रस्थापित होऊ शकते, असे राष्ट्राध्यक्षा त्साई यांनी जाहीर केले. याआधी तैवानचे लष्कर आणि हवाईतील नॅशनल गार्ड यांच्यातील सहकार्याबाबतही माहिती प्रसिद्ध झाली होती. प्रशांत महासागरातील हवाई बेट अमेरिकेचाच एक भागआहे.

leave a reply