लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनच्या लष्करामध्ये पुन्हा चर्चा होणार

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनच्या लष्करामध्ये चर्चेची नवी फेरी लवकरच पार पडेल. याआधी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमधील चर्चेची 15वी फेरी 11 मार्च रोजी पार पडली होती. यातून काहीही निष्पन्न झाले नव्हते. भारताबरोबरील सीमावाद सोडविण्यात चीनला स्वारस्य नसून चीनला सीमावाद धगधगत ठेवायचा आहे, असा आरोप भारताच्या लष्करप्रमुखांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनच्या लष्करामध्ये पुन्हा चर्चा होणारपूर्व लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी चर्चेची नवी फेरी आयोजित करण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. सध्या लडाखच्या एलएसीवर दोन्ही देशांचे 50 ते 60 हजार सैनिक तैनात आहेत. लडाखच्या एलएसीवर हजारो जवान तैनात करून भारतावर लष्करी दडपण टाकण्याचा प्रयत्न चीनने करून पाहिला होता. 2020 साली गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारतीय लष्करावर कुरघोडी करणे आपल्या प्रतिष्ठेसाठी अत्यावश्यक बनल्याचे चीनला वाटू लागले होते. त्यासाठी चीनने ही तैनाती वाढविली होती. पण तोडीस तोड तैनाती करून भारतीय लष्कराने हा डाव चीनवरच उलटविला.

de-escalate-tensionsपुढच्या काळातही दबाव वाढविण्याचे चीनचे डावपेच भारतीय लष्कराने उधळून लावले होते. या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये आत्तापर्यंत चर्चेच्या 15 फेऱ्या पार पडल्याआहेत. मात्र अजूनही पूर्व लडाखमधील काही क्षेत्रातील तणाव निवळलेला नसून चीन जाणीवपूर्वक इथला तणाव कायमठेवत असल्याचे दिसत आहे. भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी 9 मे रोजी चीनवर यासंदर्भात थेट आरो केला होता. भारताबरोबरील सीमावाद सोडविण्यात चीनला स्वारस्य नाही, उलट चीनला हा सीमावाद धगधगत ठेवायचा आहे, असे जनरल पांडे म्हणाले होते.

लष्करप्रमुखांच्या या विधानांमुळे भारत चीनबरोबरील सीमावादावरील या चर्चेकडे अत्यंत सावधपणे पाहत असल्याचे दिसते. एका कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीही चीनबाबत नेमक्या शब्दात इशारा दिला. भारत चीनकडे शत्रू म्हणून पाहत नाही. तरीही चीनने भारताच्या आत्मसन्मानला धक्का देण्याचा प्रयत्न केला, किंवा भारताची भूमी बळकावण्यासाठी हालचाली केल्या, तर भारत साऱ्या शक्तीनिशी चीनला प्रत्युत्तर देईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी बजावले आहे.

चीनच भारताचा क्रमांक एकचा भागीदार देश – चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा दावा

चीनला मागे टाकून अमेरिका भारताचा क्रमांक एकचा भागीदार देश बनल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती. चीनला ही बाब चांगलीच झोंबल्याचे दिसत आहे. अमेरिका नाही, तर चीनच भारताचा आघाडीचा व्यापारी भागीदार असल्याचा दावा चीनने केला आहे. सध्या अमेरिका भारताबरोबरील व्यापारात पुढे आहे, हे आकडेवारी वेगळ्या पद्धतीने मांडल्यामुळे दिसते, असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी केला.

भारताचे आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्चपर्यंत असते. तर चीन जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत आपल्या आर्थिक वर्षाचा हिशेब गृहित धरतो. या हिशेबाने अजूनही चीन हाच भारताचा क्रमांक एकचा व्यापारी भागीदार देश आहे, असा दावा लिजिआन यांनी केला. भारताचा चीनबरोबरील व्यापार 125.66 अब्ज डॉलर्सवर गेला आहे. तर भारत आणि अमेरिकेमधील द्विपक्षीय व्यापार 119 अब्ज डॉलर्सवर आहे, असे लिजिआन पुढे म्हणाले.

मात्र या द्विपक्षीय व्यापारात भारताला सुमारे 72.91 अब्ज डॉलर्सची व्यापारी तूट सहन करावी लागतआहे. औषधनिर्मिती व आयटी या क्षेत्रात चीन भारतीय कंपन्यांना संधी देत नसल्याने भारताला ही व्यापारी तूट सहन करावी लागते. यावर लिजिआन यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. पण चीनबरोबरील व्यापाराबाबत भारत यापुढे कठोर धोरण स्वीकारणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

leave a reply