अल-सद्र समर्थकांनी घडविलेल्या हिंसाचारात इराकमध्ये ३० जणांचा बळी, ४००हून अधिक जखमी

al-Sadr-supportersबगदाद – आपल्या समर्थकांनी सुरू केलेल्या हिंसाचारात ३० जणांचा बळी व चारशेहून अधिकजण जखमी होऊन इराकच्या राजधानीत अराजक माजविल्यानंतर, मुक्तदा अल-सद्र यांनी आपल्या समर्थकांना आंदोलन थांबविण्याचे आवाहन केले. त्याच्या आधी अल-सद्र यांच्या समर्थकांनी इराकच्या अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या ‘ग्रीन झोन’मध्ये शस्त्रास्त्रांसह घुसखोरी करून आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन केले. काही ठिकाणी त्यांची समर्थकांची इराकच्या सुरक्षा यंत्रणांशी चकमकी झडल्या. पण अल-सद्र यांनी राजकारण सोडून देण्याची घोषणा केल्यानंतर संतापलेले त्यांचे समर्थक इराकच्या सरकारला खुले आव्हान देत होते. इराकच्या सरकारी इमारती, संसद आणि महत्त्वाच्या संस्थांची कार्यालये अल-सद्र समर्थकांनी ताब्यात घेतली. यातल्या काही ठिकाणी श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

इराकच्या ग्रीन झोनमध्ये अमेरिकेसह इतर देशांचे दूतावास असून इथे इराकी सरकारच्या विविध विभागांची कार्यालये आहेत. त्यामुळे हा भाग इराकमध्ये सर्वात सुरक्षित अर्थात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेला आहे. अशा परिस्थितीत अल-सद्र यांच्या सशस्त्र समर्थकांनी इथे मोठ्या संख्येने घुसखोरी केली. रॉकेट प्रॉपेल्ड ग्रेनड्स आणि अत्याधुनिक मशिनगन्स हातात घेऊन हे अल-सद्र यांचे समर्थक इराकच्या सरकारला या भागात थेट आव्हान देत होते. सुरक्षा यंत्रणेच्या जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही ठिकाणी जबरदस्त गोळीबार झाल्याचेही दावे केले जातात. या हिंसाचारात आत्तापर्यंत ३० जणांचा बळी गेला आहे. तर जखमींची संख्या चारशेच्याही पुढे गेली आहे.

आपल्या नेत्याने राजकारण सोडून देण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी हे अराजक माजविल्याचे समोर येत आहे. सोमवारी अल-सद्र यांनी तशी घोषणा करून इराकमध्ये ही उलथापालथ माजविली. गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात इराकमध्ये निवडणूक पार पडली. इराकमध्ये बहुसंख्या असलेल्या शियापंथियांच्या उग्र संघटनेचे नेतृत्त्व करणाऱ्या मुक्तदा अल-सद्र यांच्या पक्षाने या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. तरीही या पक्षाला सरकार स्थापन करता आले नव्हते. तर इराणचे पाठबळ लाभलेल्या इराकमधील राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सरकारची स्थापना केली होती.

fighters-during-clashes-baghdadयामुळे खवळलेले अल-सद्र आणि त्यांचे समर्थक सातत्याने पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी करीत आहेत. इराकचे सध्याचे सरकार इराणच्या तालावर नाचणारे असल्याचा आरोप करून, अल-सद्र ही मागणी अधिकाधिक प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही महिन्यांपासून इराकची संसद व इतर महत्त्वाच्या ठिकाणी अल-सद्र यांच्या समर्थकांनी घुसखोरी करून त्यांचा ताबा घेतला होता. तरीही इराकचे सरकार नव्याने निवडणूक घेण्यासाठी तयार होत नाही, हे पाहून अल-सद्र यांनी राजकारण सोडून देण्याची घोषणा केली. सोमवारी त्यांनी ही घोषणा करताच, इराकमध्ये खळबळ माजली. अल-सद्र यांच्या समर्थकांनी इराकच्या राजधानी हाहाकार माजवून साऱ्या देशाला वेठीस धरण्याची ताकद आपल्याकडे आहे, हे दाखवून दिले. त्याचे पडसाद केवळ इराकच नाही, तर आखाती क्षेत्रात उमटत आहेत.

इराकमधील अस्थैर्यामुळे आपल्या देशात घुसखोरी होणार नाही, याची दक्षता घेऊन इराणने आपली इराकलगतची सीमा सील करून टाकली. तर सौदी अरेबियाने इराकच्या सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या समस्येतून मार्ग काढावा, असे आवाहन केले आहे. तर युरोपिय महासंघाने इराकमधील परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. पण इराकमधील इराणसमर्थक सरकारशी आपला संघर्ष इतक्यात थांबणार नाही, असा स्पष्ट संदेश अल-सद्र देत आहेत. देशात पुन्हा निवडणूक घ्यावी आणि जनाधार लाभलेले सरकारच या देशात सत्तेवर यावे, अशी अल-सद्र यांची प्रमुख मागणी आहे. इराकमधील सध्याचे सरकार ही मागणी मान्य करायला तयार नाही. त्याचवेळी अल-सद्र यांच्या सामर्थ्यप्रदर्शनामुळे अस्वस्थ झालेले इराणसमर्थक राजकीय पक्ष व गट पुढच्या काळात आपल्या शक्तीप्रदर्शनाद्वारे इराकला अधिकच अस्थीर करू शकतील. त्यामुळे इराकमधील परिस्थिती इतक्यात नियंत्रणात येण्याची शक्यता नाही.

leave a reply