अरबी समुद्रात पाकिस्तानी बोटीतून तीन हजार कोटींचे अमली पदार्थ जप्त

- पाच जणांना अटक

कोची – भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस सुवर्णा’ या नौदलाच्या गस्तीनौकेने अरबी समुद्रात कोचीजवळ एका संशयित बोटीचा थरारक पाठलाग करीत ताब्यात घेतले. या बोटीवर ३०० किलो अमली पदार्थ सापडले असून याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे तीन हजार कोटी रुपये इतके आहे. ही बोट पाकिस्तानच्या बलोचिस्तानातील मकरान किनारपट्टीवरून निघाली होती, अशी माहिती संरक्षण विभागाच्या अधिकार्‍याने दिली आहे.

भारतीय नौदलाने अरबी समुद्रातून चालणार्‍या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट सोमवारी उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईत पकडण्यात आलेले अमली पदार्थांचे प्रमाण आणि मूल्याचा विचार करता ही कारवाई मोठी आहेच, याचबरोबर पाकिस्तानातून करण्यात येणार्‍या अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे नष्ट करण्याच्या दृष्टीनेही ही कारवाई मोठी आहे.

कोची किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात भारतीय नौदलाची गस्तीनौका ‘आयएनएस सुवर्णा’ गस्त घालत असताना एका बोटींच्या संशयित हालचाली दिसून आल्या. त्यानंतर या बोटीचा पाठलाग करीत तीला अडविण्यात आले. या बोटीची तपासणी केली असताना बोटीवर तीन हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले. बोटीवरील सर्व खलाशी हे श्रीलंकन असून या तस्करी रॅकेटचा मोठा खुलासा त्यांच्या चौकशीतून होण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात नक्की कुठे ही कारवाई करण्यात आली याचा खुलासा अधिकार्‍यांनी केलेला नाही. मात्र या बोटीला आता कोची बंदरात आणण्यात आले असून तस्करांची कसून चौकशी सुरू आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून पाकिस्तानातून समुद्रामार्गाने भारतात होणार्‍या अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. यासाठी श्रीलंकन, इराणी मच्छिमार बोटींचा वापर केला जात असल्याचेही लक्षात आले आहे. भारत, श्रीलंका, मालदीवमध्ये हे अमली पदार्थ तस्करी केले जात आहेत.

गेल्या चार महिन्यात अरबी समुद्रात तटरक्षक दल, नौदलाने अमली पदार्थ तस्करीचे मोठे प्रयत्न उधळून लावले आहेत. गेल्याच आठवड्यात कच्छ जवळ ३०० कोटीचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. तर मार्च महिन्यात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सहा हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तसेच या कारवायांमध्ये शस्त्रास्त्रांसह २५ तस्करांना अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर महिन्यात तमिळनाडूच्या तुतीकोरीनजवळही पाकिस्तानातून आलेल्या बोटीतून हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडण्यात आले होते. यावेळीे सहा श्रीलंकन तस्करांना अटक करण्यात आली होती.

leave a reply