अठरा वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस मिळणार

नवी दिल्ली – देशात आता कोरोनाची लस अठरा वर्षावरील सर्वांना घेता येणार आहे. १ मे पासून लसीकरणाच्या पुढील टप्प्यात अठरा वर्षावरील सर्वांचे लसीकरण सुरू होईल. तसेच आता राज्य सरकारे, खाजगी रुग्णालये, औद्योगिक संस्था लस उत्पादकांकडून थेट लस खरेदी करू शकतात, असा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तज्ज्ञ व वरिष्ठ अधिकार्‍यांशी सोमवारी चर्चा केली व कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. रविवारीही पंतप्रधानांनी एक उच्चस्तरिय बैठक केली होती. या बैठकीत आलेल्या सूचना व इतर बाबींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. यामुळे देशात लसीकरण कार्यक्रमाला आणखी वेग मिळणार आहे.

देशात सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांसाठीच कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होता. जानेवारीमध्ये सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस व इतर फ्रन्टलाईन वर्कर्ससाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते. तर मार्च पासून जेष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. पण थोड्याच दिवसात ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनामुळे जाणारे बळी हे प्रामुख्याने ४५ वर्षांवरील असल्याने हे मृत्यु कमी करण्यासाठी प्राधान्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते.

मात्र सध्या कोरोनाच्या नव्या लाटेचा उद्रेक देशात झाला असून तरुण आणि लहान मुलेही कोरोनाच्या म्युटेशन झालेल्या विषाणूने मोठ्या प्रमाणावर बाधीत होत आहेत. रविवारपासून सोमवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशात सुमारे १६०० जणांचा बळी गेला, तसेच २ लाख ७३ हजार नवे रुग्ण आढळले. या सर्व पार्श्‍वभूमीवर अठरा वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण करण्यात यावे अशी मागणी होत होती. मात्र लसीकरणाचा उद्देश हा प्राणहानी रोखणे असून जगात सर्वत्र वयोगटानुसारच लसीकरण करण्यात आल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता अठरा वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुले करण्यात आले आहे. मात्र ४५ वर्षांवरील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण सुरू राहणार आहे.

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार लस उत्पादक हे उत्पादन घेत असलेल्या ५० टक्के लसी ठरलेल्या किंमतीमध्ये या केंद्र सरकारला पुरवतील. तर उर्वरित ५० टक्के लसी ते या ठरलेल्या किंमतीत राज्य सरकारांना किंवा खुल्या बाजारात विकू शकतील. सध्याचा उद्रेक पाहता लसीकरणाचा वेग वाढविण्याकरिताच केंद्र सरकारने लसीकरणाची पात्रता, पुरवठा यामध्ये लवचिकता आणली आहे. देेशात सध्या १० कोटी जणांना लस देण्यात आली असून जगात सर्वाधिक वेगाने दहा कोटींचा टप्पा भारतात भारताने गाठला आहे. तसेच केंद्र सरकारने आतापर्यंत १२ कोटी ७० लाख कोविशिल्ड आणि १ कोटी ७० लाख कोव्हॅक्सिन विविध राज्यांना पुरविल्या आहेत.

महाराष्ट्रात निर्बंध अधिक कडक होणार

सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाने ३५१ जण दगावले, तर ५८ हजार ९२४ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात संचारबंदी लागू असली तरी कित्येक जण रस्त्यावर कारण नसताना बाहेर पडताना दिसत आहेत. असे सुरू राहिले, तर कोरोनाच्या साथीला अटकाव करता येणार नाही. या पार्श्‍वभूमीवर आता निर्बंध आणखी कडक करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. किरणामालाची दुकानेही सकाळी ७ ते ११ यावेळेतच सुरू ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेतखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

राज्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. सोमवारी कोरोनाने झालेले मृत्यू आणि नव्या रुग्णांची संख्या गेल्या चार दिवसांच्या तुलनेत कमी असली ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या पावणे सात लाखांवर पोहोचली आहे. यामुळे आरोग्य सुविधांवर प्रचंड ताण आला असून ऑक्सिजन, रेडमेसिवीर इंजेक्शनसह बेडची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत काही जीवनावश्यक सेवा व उद्योगांना मूभा देऊन लावण्यात आलेली संचारबंदी नागरिक गांभिर्याने घेताना दिसत नसल्याचे चित्र आहे. काही जण किराणामालाच्या नावाखाली बाहेर फिरत असून ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आता किराणामालाची दुकाने केवळ ठरावीक वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सध्याचे निर्बंध आणखी कडक करण्याचे संकेतही राज्य सरकारने दिले आहेत. निदान १ मे पर्यंत तरी कडक लॉकडाऊन हवा अशा सूचना तज्ज्ञांनी दिल्या असून मुख्यमंत्री दोन दिवसात यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

 

leave a reply