अमेरिकेने अफगाणिस्तानातून लवकर सैन्यमाघार घ्यावी

- माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची बायडेन यांच्यावर टीका

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या संपूर्ण सैन्यमाघारीसाठी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ११ सप्टेंबरचा दिवस निवडला. यावर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ताशेरे ओढले आहेत. यामुळे अमेरिकेची सैन्यमाघार अधिक लांबणीवर पडली आणि याने अब्जावधी डॉलर्सचा चुराडा होईल, अशी टीका ट्रम्प यांनी केली. याबरोबरच अमेरिकेवर झालेल्या ९/११ हल्ल्यामुळेच अमेरिकेला अफगाणिस्तानात युद्ध पुकारावे लागले होते. या युद्धाची अखेर करण्यासाठी ११ सप्टेंबरची निवड करणे म्हणूनच अप्रस्तुत ठरते, हा दिवस दहशतवादी हल्ल्यातील बळींचा स्मरणदिन म्हणून कायम राहिलेला बरा, असे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीची घोषणा केली. ओसामा बिन लादेनला संपविणे आणि अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांची केंद्र नष्ट करणे, ही आपली दोन मुख्य उद्दिष्टे पूर्ण झाल्यामुळे अमेरिका अफगाणिस्तानातू माघार?घेत असल्याचे बायडेन म्हणाले होते. ही माघार १ मेपासून सुरू होईल व ११ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केले. अफगाणिस्तानात अमेरिकेचे २,५०० जवान तैनात असून या सैन्यमाघारीत कुठल्याही प्रकारची घाई केली जाणार नसल्याचे बायडेन म्हणाले होते.

बायडेन यांच्या या सैन्यमाघारीचे नाटो सदस्य देशांनी स्वागत केले. तसेच अमेरिकेबरोबर आपले लष्करही अफगाणिस्तानातून माघार घेईल, अशी घोषणा ब्रिटन, जर्मनी या देशांनी केली होती. पण अमेरिकेतील काही वरिष्ठ सिनेटर्सनी या सैन्यमाघारीच्या घोषणेवर टीका केली होती. त्यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची देखील भर पडली आहे. बायडेन प्रशासनाने ११ सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानातील सैन्यमाघार लांबवू नये, त्याआधीच लवकरात लवकर अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घ्यावी, असे ट्रम्प म्हणाले.

‘गेल्या १९ वर्षांमध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातील युद्धात अब्जावधी डॉलर्स खर्च केले तसेच लष्करी वाहने तैनात केली आहेत. यापुढेही काही महिन्यांसाठी ही तैनाती कायम ठेवून अमेरिका अधिक अब्जावधी डॉलर्स खर्च करीत आहे’, याची आठवण ट्रम्प यांनी करून दिली. त्याचबरोबर ‘९/११ हा दिवस आपण गमावलेल्या महान आत्म्यांचा स्मरणदिवस असून अशा दिवसापर्यंत सैन्यमाघार लांबविणे योग्य ठरणार नाही’, असे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सैन्यमाघारीबाबत केलेली घोषणा दोहा कराराचे उल्लंघन करणारी असल्याचा इशारा तालिबानने दिला आहे. ‘१ मेपर्यंत अमेरिका व नाटोने पूर्ण माघार घ्यावी, अशी आपली मागणी होती. पण अमेरिकेवर विश्‍वास ठेवता येऊ शकत नाही, हे यातून स्पष्ट झाले’, अशी टीका तालिबानने केली. त्याचबरोबर १ मे नंतरही अमेरिका व नाटोचे जवान अफगाणिस्तानात तैनात दिसले तर पुढे जे काही होईल, त्याला अमेरिका सर्वस्वी जबाबदार असेल, असा इशारा तालिबानने दिला आहे.

leave a reply