छत्तीसगडमध्ये ३२ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

रायपूर – रविवारी छत्तीसगडच्या दांतेवाडा जिल्ह्यात ३२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या भागात सुरक्षादलांवर झालेल्या कित्येक हल्ल्यात या माओवाद्यांचा हात होता. तसेच यातील सहा माओवाद्यांवर चार लाख रुपयांचे इनाम होते.  जून महिन्यात स्थानिक पोलिसांनी ‘लोन वरतु’ अर्थात ‘घराकडे परत या ‘ नावाचे अभियान सुरु केले होते. या अभियानांतर्गत रविवारी ३२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

आत्मसमर्पण

आत्मसमर्पण केलेल्या ३२ माओवाद्यांमध्ये दहा महिला आहेत. या महिला माओवाद्यांच्या विचारसरणीला कंटाळल्या होत्या. तसेच त्या ‘लोन वरतु’ उपक्रमाने प्रभावित झाल्या होत्या.  ३२ पैकी १९ माओवादी छत्तीसगडच्या बाकेली गावचे, चार कोरकट्टी गावाचे, तर प्रत्येकी तीन उडेनर, तुमरीगुंडा आणि मातासी गावाचे आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या ३२ माओवाद्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. हे माओवादी ‘दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटन’, ‘क्रांतिकारी महिला आदिवासी संघटन’, ‘चेतना नाट्य मंडळी’ आणि ‘जनतना सरकार ‘गटाचे सक्रीय सदस्य होते.

३२ माओवाद्यांना आत्मसमर्पण केल्यानंतर तातडीने त्यांना पुनवर्सनासाठी १०,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य केले. तसेच त्यांना रोजगाराचे आश्वासन दिले आहे. जून महिन्यात हे अभियान सुरु झाल्यानंतर आतापर्यंत दांतेवाडा जिल्ह्यातल्या १५० माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यातील ४२ माओवाद्यांच्या शीरावर इनाम होते. तर या जिल्ह्यातील आणखी ५० ते ६० माओवादी आत्मसमर्पणाच्या तयारीत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

leave a reply