अमेरिका-जपानच्या नौदल सरावानंतर चीनच्या ३९ विमानांची तैवानच्या हद्दीत घुसखोरी

तैवानच्या हद्दीततैपेई – रविवारी चीनच्या ३९ लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत प्रवेश केला. चीनची या वर्षातील ही सर्वात मोठी तर आत्तापर्यंतची दुसरी मोठी घुसखोरी ठरते. काही तासांपूर्वी अमेरिका आणि जपानच्या युद्धनौकांनी तैवानजवळच्या ‘फिलिपाईन्स सी’मध्ये मोठा सराव केला होता. त्यानंतर चीनने आपली विमाने रवाना करून तैवानच्या बाजूने उभे राहणार्‍या अमेरिका आणि जपानला इशारा दिल्याचा दावा केला जातो.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री चीनच्या २४ जे-१६ तसेच १० जे-१० लढाऊ विमाने, अण्वस्त्रवाहू एच-६ बॉम्बर आणि इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रात वापरल्या जाणार्‍या विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली. तैवानच्या हवाईदलाने रडारवर चिनी विमानांची घुसखोरी हेरल्यानंतर आपली लढाऊ विमाने रवाना केली. त्याचबरोबर तैवानच्या लष्कराने हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून चीनच्या घुसखोरी लढाऊ विमानांना इशारा दिला. यानंतर चिनी विमानांनी माघार घेतल्याचे तैवानने म्हटले आहे.

तैवानच्या हद्दीतया वर्षातील चीनच्या लढाऊ विमानांची ही सर्वात मोठी घुसखोरी ठरते. चीनने गेल्या २३ दिवसांमध्ये तैवानच्या हद्दीत १५ वेळा लढाऊ विमाने रवाना केली आहेत. गेल्या वर्षी २ ऑक्टोबर रोजी चीनच्या ५६ विमानांनी तैवानच्या हद्दीत प्रवेश करून या क्षेत्रात कमालीचा तणाव वाढविला होता. गेल्या वर्षभरात चीनने तैवानच्या हवाईहद्दीत ९६१ विमाने घुसविली होती. गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या सत्ताबदलानंतर चीनच्या विमानांच्या घुसखोरीची तीव्रता वाढली आहे. रविवारच्या या घुसखोरीवर चीनने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पण काही तासांपूर्वी अमेरिका व जपानच्या युद्धनौकांनी तैवानच्या आखाताजवळील ‘फिलिपाईन्स सी’च्या क्षेत्रात मोठा सराव आयोजित केला होता. यामध्ये अमेरिकेच्या नौदलातील ‘युएसएस कार्ल विन्सन’, ‘युएसएस अब्राहम लिंकन’ या दोन विमानवाहू युद्धनौकांसह ‘युएसएस अमेरिका’, ‘युएसएस इसेक्स’ तसेच जपानच्या ऍम्फिबियस विमानवाहू युद्धनौका आणि विनाशिकांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर अमेरिकेच्या अतिप्रगत लढाऊ, इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रात वापरले जाणारे विमान अणि टेहळणी विमानांनी संयुक्त गस्त घातली होती.

तैवानच्या हद्दीतमुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी हा संयुक्त सराव केल्याचे अमेरिकेच्या नौदलाने जाहीर केले होते. अमेरिकी नौदलाच्या या सरावाला उत्तर म्हणून चीनने तैवानच्या हद्दीत एवढ्या मोठ्या संख्येने विमाने रवाना करून अमेरिका व जपानला इशारा दिल्याचा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहेत. चिनी लढाऊ विमानांच्या घुसखोरीच्या या वाढत्या घटना म्हणजे तैवानवरील आक्रमणापूर्वीची तालीम असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.

गेल्या वर्षभरात चीन तैवानविरोधात अधिक आक्रमक झाला असून ‘ग्रे झोन वॉरफेअर’ व युद्धसरावांची तीव्रता वाढल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. चीनचे नेतृत्त्व तसेच लष्करी अधिकारी तैवानला सातत्याने धमकावत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक चीन व तैवानमधील युद्धाबाबत विविध शक्यता वर्तवित आहेत. मात्र चीनने तैवानवर केलेल्या आक्रमणातून लगेच निकाल लागण्याची शक्यता नाही. कारण चीनने तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका व सहकारी देश त्यात उतरतील, पण त्यात कोणीही निर्णायक विजय मिळवू शकणार नाही, असा दावा अमेरिकेतील प्रसिद्ध अभ्यासगट ‘ब्रुकिंग्ज् इन्स्टिट्यूट’मधील अभ्यासकांनी केला होता. त्यामुळे हे युद्ध प्रदीर्घ काळापर्यंत चालेल, अशी शक्यता या विश्‍लेषकांनी नोंदविली होती.

leave a reply