पाकिस्तानात आलेल्या वादळामुळे महाराष्ट्र, गुजरातमध्ये धुळीचे वारे

- मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हवेची गुणवत्ता खालावली

• मंगळवारपर्यंत वातावरण असेच राहण्याची शक्यता
मुंबई – पाकिस्तानात दोन दिवसांपूर्वी धुळीचे वादळ उठले होते. कराचीत आलेल्या या धुळीच्या वादळामुळे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोव्याला धुळींच्या वार्‍याचा तडाखा बसला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणातील इतर जिल्ह्यात यामुळे वातावरणात प्रचंड धुळीकण होते व दृष्यमानताही कमी झाली होती. हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली होती. तसेच हवेत गारठा वाढला, तर काही भागात पाऊसही झाला. या धुळीच्या वादळाचा परिणाम मंगळवारपर्यंत कायम राहणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानात आलेल्या वादळामुळे महाराष्ट्र, गुजरातमध्ये धुळीचे वारे - मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हवेची गुणवत्ता खालावलीपाकिस्तानात आलेल्या धुळीच्या वादळाचा परिणाम भारतातही दिसून आला आहे. कराचीतील जनजीवन या धुळीच्या वादळामुळे दोन दिवसांपूर्वी पूर्णपणे विस्कळीत झाले होते. या धुळीचे कण अरबी समुद्रातून भारतीय किनारपट्टीवरील राज्यांपर्यंत पोहोचले आहेत. शनिवारी गुजरातच्या कच्छ, सौराष्ट्रमध्ये या धुळीकणांमध्ये दृष्यमानता कमी झाली होती. राजस्थानला जास्त फटका बसला होता. आजही गुजरातमधील किनारपट्टीकडील भागात तसेच वातावरण होते.

तर महाराष्ट्रातही कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये हे धुळीचे वारे धडकले. मुंबई, ठाणे पालघर जिल्ह्यात दृष्यमानता खूपच कमी झाली होती. तर कोकणातील इतर जिल्ह्यातही वातावरण धुळीकण दिसून येत होते. वाहनांवर सूक्ष्म पांढरट धुळीकणांचे थर साचलेले पहायला मिळाले होते. मुंबईत यामुळे एअर क्वालिटी इंडेक्स अर्थात हवेचा गुणवत्ता निर्देशांक २०० वर पोहोचला होता. मुंबईतील काही भागात हाच निर्देशांक ३०० च्या पुढे गेला होता.

याशिवाय २० ते २५ किलोमीटर वेगाने वाहणार्‍या वार्‍यांमुळे आणि वातावरणातील धुळीकणांमुळे पाराही घसरला होता. पुण्यातही या धुळींच्या वार्‍यांचा परिणाम दिसून आला. किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये रविवारी दुपारनंतर त्याची तीव्रता आणखी वाढली. सोमवार सकाळपर्यंत उत्तर कोकणात धुळींच्या वार्‍यांचा प्रभाव वाढणार असल्याचे सांगितले जाते. मात्र मंगळवारपर्यंत वातावरण स्वच्छ होईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

साधारणपणे पाकिस्तानात येणार्‍या धुळींच्या वादळांचा परिणाम उत्तरेकडील राज्यांमध्ये दिसून येतो. किनारपट्टी क्षेत्रात त्याचा प्रभाव कमी दिसतो. पण यावेळेला अरबी समुद्र मार्गाने किनारपट्टी क्षेत्रात वार्‍यांसह ही धूळ मोठ्या प्रमाणावर धडकली आहे. याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. मुंबईत काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात अनेक भागांना अवकाळी पावसाने तडाखाला दिला.

leave a reply