चीनच्या राजवटीकडून ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक

कॅनबेरा/बीजिंग – चीनच्या सत्ताधारी राजवटीने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक केल्याचे समोर आले आहे. ऑस्ट्रेलियातील राजकीय विश्‍लेषक व तज्ज्ञांनी ही घटना चीनची सेन्सॉरशिप व हस्तक्षेपाचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. चीनने मात्र सदर प्रकरण पंतप्रधान व कंपनीदरम्यानचा वाद असल्याचे सांगून हात झटकले आहेत.

चीनच्या राजवटीकडून ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅकचीनच्या राजवटीकडून ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचे सोशल मीडिया अकाऊंट हॅकऑस्ट्रेलियात चिनी वंशाच्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. या नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पंतप्रधान मॉरिसन यांच्यासह ऑस्ट्रेलियातील अनेक नेत्यांनी ‘वुई चॅट’ या चिनी सोशल मीडिया साईटवर अकाऊंट उघडले आहेत. या अकाऊंटवर ऑस्ट्रेलियन सरकार तसेच राजकीय वर्तुळातील घडामोडींची माहिती चिनी भाषेत दिली जाते. मॉरिसन यांनी २०१९ साली वुई चॅटवर अकाऊंट उघडले असून त्याचे ७६ हजार फॉलोअर्स आहेत.

गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून मॉरिसन व त्यांच्या टीमचा या अकाऊंटला असणारा ऍक्सेस अचानक काढून घेण्यात आला. यासंदर्भात वारंवार तक्रारी नोंदवूनही ‘वुई चॅट’ची मालकी असणार्‍या ‘टेन्सेंट’ या कंपनीने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही. त्यानंतर २०२२च्या सुरुवातीला अचानक मॉरिसन यांचे अकाऊंट ‘ऑस्ट्रेलियन चायनीज न्यू लाईफ’ या नावाने सुरू झाल्याचे दाखविण्यात आले. नवे अकाऊंट चालविणार्‍या कंपनीने आपण ते विकत घेतल्याचा दावा केला आहे.

मात्र ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञांनी ही बाब चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या सेन्सॉरशिप व राजकीय हस्तक्षेपाचा भाग असल्याचा आरोप केला आहे. गेले दोन वर्षे चीन ऑस्ट्रेलियावर विविध मार्गांनी दडपण टाकण्याचा प्रयत्न करीत असून पंतप्रधानांचे अकाऊंट बंद पाडून ते प्रचारासाठी वेगळ्या नावाने चालविले जाणे अशाच प्रयत्नांचा भाग असल्याचा दावा केला आहे.

leave a reply