न्यूझीलंडच्या सुपरमार्केटमधील हल्ल्यात चार जखमी – पंतप्रधान आर्डर्न यांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता फेटाळली

वेलिंग्टन – न्यूझीलंडच्या डुनेडीन शहरात एका सुपरमार्केटमध्ये माथेफिरूने केलेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत. न्यूझीलंडच्या पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतली असून त्याची चौकशी सुरू आहे. याचा संबंध दहशतवादी हल्ल्याशी जोडता येणार नसल्याचे पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी म्हटले आहे. याआधी २०१९ साली न्यूझीलंडला ख्राईस्टचर्च शहरातील हल्ल्याने हादरविले होते.

आर्डर्नन्यूझीलंडच्या दक्षिणेकडे असलेल्या डुनेडीने बंदरातील काऊंटडाऊन या सुपरमार्केटमध्ये सोमवारी दुपारी हा हल्ला झाला. यावेळी सुपरमार्केटमध्ये स्थानिकांची गर्दी होती. हल्लेखोराने सुरुवातीला सुपरमार्केटमधील दोन कर्मचार्‍यांवर चाकूने हल्ला केला. या हल्लेखोराला रोखण्याचा व पकडण्याचा प्रयत्न सुपरमार्केटमधील काही ग्राहकांनी केला. या प्रयत्नात हल्लेखोराने त्यांच्यावरही चाकूने वार केले. यानंतर या परिसरात मोठा आरडाओरडा झाला. स्थानिक पोलिसांनी त्वरीत कारवाई करून हल्लेखोराला ताब्यात घेतले.

आर्डर्नया हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर हल्लेखोरालाही त्याच रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. न्यूझीलंडच्या पोलिसांनी तसेच सरकारने हल्लेखोराची ओळख उघड केलेली नाही. तसेच या हल्ल्यामागील नेमके कारण देखील प्रसिद्ध केलेले नाही. अद्याप प्राथमिक स्तरावर चौकशी सुरू असल्याचे स्थानिक पोलीस प्रमुखांनी म्हटले आहे. तसेच कोणत्याही उद्देशाशिवाय हा हल्ला केला असावा, अशी शक्यता स्थानिक पोलीस प्रमुखांनी व्यक्त केली.

आर्डर्नन्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न या हल्ल्याची दखल घेतली तसेच पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा केली. ‘ह्या घडीला, डुनेडीनमधील हल्ल्याचा संबंध दहशतवादी हल्ल्याशी जोडता येणार नाही. असे कुठलेही पुरावे पोलिसांना सापडलेले नाहीत’, असे पंतप्रधान आर्डर्न म्हणाल्या. तसेच या हल्ल्याला रोखण्यासाठी सुपरमार्केटमधील ग्राहकांनी दाखविलेल्या शौर्याचे पंतप्रधान आर्डर्न यांनी कौतूक केले.

याआधी २०१९ साली न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरात मोठा घातपाती हल्ला झाला होता. स्थानिकाने येथील एका प्रार्थनास्थळात घुसून बेछूट गोळीबार केला होता. या हल्ल्यात ५१ जणांचा बळी गेला होता. पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी त्या हल्ल्याची कठोर शब्दात निर्भत्सना केली होती.

leave a reply