धनोत्रयोदशीच्या दिवशी देशात ४० टन सोन्याची विक्री`

मुंबई – कोरोनाचे संकट त्यामुळे अर्थव्यवस्थेत होत असलेली घसरण या सर्वाकडे दुर्लक्ष करत धनोत्रयोदशीच्या निमित्ताने भारतीयांनी ४० टन सोने खरेदी केले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी धनोत्रयोदशीला ३० टक्के जास्त सोन्याची विक्री झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तब्बल २० हजार कोटी रुपयांची सोन्याची विक्री या एका दिवसात झाली.

गेल्यावर्षी धनोत्रयोदशीला ३० टन सोन्याची विक्री झाली होती. १२ हजार कोटी रुपये सोने २०१९ सालच्या धनोत्रयोदशीला विकले गेले होते. यावर्षी सोन्याचे दर ५० हजारांवर गेले असतानाही सोन्याची विक्री गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल ३० टक्क्यांनी वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. यावर्षी ४० टन सोने विकले गेले, असे इंडिया बुलियन अँण्ड ज्वेलर्स असोसिएशनतर्फे (आयबीजेए) सांगण्यात आले.

लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने गेल्या काही महिन्यात सोन्याच्या प्रत्यक्ष विक्रीत घाट झाली होती. त्यातच सोन्याचे भाव देखील वधारले होते. मात्र सणासुदीचा काळात पुन्हा सोने खरेदी वाढली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर सोने विकले गेले. यावर्षी देशात काही भागात धनत्रयोदशी दोन दिवस साजरी करण्यात आली. काही ठिकाणी गुरुवारी धनत्रयोदशी साजरी करण्यात आल्याने सोन्याच्या खरेदीत वाढ झाल्याचे ‘आयबीजेए’ चे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेंद्र मेहता म्हणाले.

leave a reply