मुहूर्ताच्या विशेष व्यवहारात मुंबई निर्देशांक विक्रमी पातळीवर

मुंबई- २०७७ या नव्या संवत्सराच्या निमित्ताने पार पडलेल्या मुहूर्ताच्या विशेष व्यवहारात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने विक्रमी पातळी गाठली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकामध्ये १९४.९८ अंशांची वाढ होत निर्देशांक ४३,६३७.९८ अंशावर बंद झाला. निफ्टी निर्देशांकही १२,७८०.३० अंशाच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.

शनिवारी सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी मुहूर्ताच्या विशेष व्यवहाराला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण होते. एक तास पार पडलेल्या या व्यवहारात सर्वच क्षेत्रात खरेदीचा ओघ दिसून आला. मुंबई शेअर बाजारातील ३० मुख्य कंपन्यांपैकी २२ कंपन्यांचे शेअर्स वधारले. ऍक्सिस बँक, एचडीएफसी बँक, सन फार्मा, टाटा स्टील, एचसीएसल टेक, महिंद्रा अँड महिंद्रा, एअर टेल, एचयूएल, बजाज ऑटो, मारुती आणि इन्फोसिसचे शेअरमध्ये वधारले. तर पॉवरग्रीड, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट आणि बजाज फायनान्सच्या समभागात घसरण झाली.

अनलॉकनंतर देशभरात व्यवहाराला सुरुवात झाली असून अर्थव्यवस्थेने वेग पकडले असल्याचे दिसत आहे. देशाच्या आर्थिक विकासात घट होणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत होते. मात्र यापूर्वी वर्तवण्यात आलेल्या अंदाजाच्या तुलनेत अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल अशा शक्यता वर्तविण्यात आल्या आहेत. अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सुधारणांचे सकारात्मक परिणाम शेअर बाजारात दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

leave a reply