केंद्राकडून राज्यांना ५० हजार ‘मेड इन इंडिया’ व्हेंटिलेटर्स

नवी दिल्ली – ‘मेड इन इंडिया’ अंतर्गत देशात ५० हजार व्हेंटिलेटर्सची निर्माती करण्यात येणार असून लवकरच हे व्हेंटिलेटर्स सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात येतील असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले. त्यासाठी पीएम केअर्स फंडमधून दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. .

Made in India-ventilatorsदेशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रुग्णांचा आकडा ४ लाख ४० हजारांवर पोहोचला आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता सरकारकडून रुग्णालयात आवश्यक त्या सोयीसुविधां उपलब्ध करण्यात येत आहेत. आयसोलेशन सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. यासह रेल्वेच्या डब्यांचे रूपांतर आयसोलेशन कोचमध्ये करण्यात आले आहे. गरजेनुसार प्रत्येक राज्याकडून आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत. आयसोलेशन सेंटरची उभारणी करण्यात येत असली तरी या सेंटरमध्ये गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर्सची आवश्यकता भासू शकते, हे लक्षात घेता मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर्सचे उत्पादन करण्यात येणार आहे.

लवकरात लवकर हे व्हेंटिलेटर्स सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारी कोविड रुग्णालयांपर्यंत पोहचवण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. ५० हजार व्हेंटिलेटर्सपैकी ३० हजार व्हेंटिलेटर्सची निर्मिती भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून करण्यात येणार आहे. उर्वरित २० हजार व्हेंटिलेटर्सपैकी १० हजार व्हेंटिलेटर्स एग्वा हेल्थ केअर, ५६५० एएमटीझेड बेसिक, ४ हजार एएमटीझेड हाय एन्ड, ३५० अलाईड मेडिकलमध्ये तयार करण्यात येत आहेत.

आतापर्यंत २९२३ व्हेंटिलेटर्सची निर्मिती करण्यात आली असून त्यापैकी १३४० व्हेंटिलेटर्स राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीतील रुग्णांची वाढती संख्या पाहता या राज्यांना प्रत्येकी २७५ व्हेंटिलेटर्स देण्यात आली आहेत. याचबरोबर गुजरातला १७५, बिहार १००, कर्नाटक ९० आणि राजस्थानला ७५ व्हेंटिलेटर्स पुरवण्यात आली आहेत. जूनच्या अखेरपर्यंत अतिरिक्त १४ हजार व्हेंटिलेटर्स राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

leave a reply