महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसमुळे ४५ मृत्यू – रुग्णांची संख्या ८०० वर  

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसमुळे एका दिवसात १३ जणांचा बळी गेला. त्यामुळे महाराष्ट्रातील या साथीमुळे दगावलेल्यांची संख्या ४५ पर्यंत पोहोचली आहे. तसेच राज्यातील रुग्णांची संख्या वाढून सुमारे ८०० पर्यंत पोहोचली आहे. रविवारी राज्यात  एका दिवसात ११३ नवे रुग्ण आढळून आले होते, तर सोमवारी सकाळी आणखी ३३ नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या काही दिवसात मुंबई, पुणे आणि नागपूर सारख्या महानगरांमध्ये या साथीच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. या तीन महानगरमध्येच ८५ टक्के रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण मुंबईत असून मुंबईतील रुग्णांची संख्या ४७० पर्यंत पोहोचली आहे.  

सोमवारी सकाळी महाराष्ट्रात ३३ नवे रुग्ण आढळल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिली. यातील पुण्यात १९, मुंबईत ११, सातारा, अहमदनगर आणि वसईत प्रत्येकी एक रुग्ण आढळला. याआधी रविवारी दिवसभरात ११३ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. यातील ८१ रुग्ण केवळ मुंबईत आढळले होते. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण मुंबईतीलच आहेत. 

वरळी-प्रभादेवी, ग्रॅण्ट रोड, अंधेरी आणि धारावी भागात नवे रुग्ण आढळून येत आहेत. वरळीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. येथील प्रभाग क्षेत्रात ५८ रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. वरळी कोळीवाडा भाग पूर्णपणे नागरिकांच्या रहदारीसाठी बंद  करण्यात आला आहे. ग्रॅण्ट रोड भागातही ३३ रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. महामुंबई परिक्षत्रात कल्याण डोंबिवलीमध्ये 33 रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. 

रविवारी मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ड रुग्णालयात २६ परिचारिका आणि ३ डॉक्टरांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हे रुग्णालय सील करावे लागले. काही दिवसांपूर्वी या रुग्णालयात दोन कोरोनाग्रस्त  रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. या रुग्णांपासून या सर्वाना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. 

leave a reply