सिरियातील बॉम्बस्फोटात ४६ ठार – तुर्कीचा सिरियन कुर्दांवर आरोप

सिरियातील बॉम्बस्फोटात ४६ ठार – तुर्कीचा सिरियन कुर्दांवर आरोप

दमास्कस – सिरियाच्या आफ्रिन भागात झालेल्या बॉम्बस्फोटात किमान ४६ जणांचा बळी गेला आहे. सिरियातील तुर्की संलग्न बंडखोर या हल्ल्यात ठार झाल्याचा दावा केला जातो. संतापलेल्या तुर्कीने या हल्ल्यांसाठी सिरियातील कुर्द बंडखोरांना जबाबदार धरले आहे. तर चार दिवसांपूर्वी तुर्कीने सिरियात घडविलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला झाल्याचे बोलले जाते. आफ्रिनमधील या हल्ल्यावर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे.

सिरियाच्या उत्तरेकडील आफ्रिन शहरातील एका गर्दीच्या ठिकाणी हा स्फोट घडविण्यात आला. सिरियातील नागरी सुरक्षा संस्था आणि ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात ४६ जण ठार झाले तर किमान ५० जण जखमी झाले. या स्फोटाची तीव्रता लक्षात घेता, बळींची संख्या वाढू शकते, असे स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तुर्कीने या स्फोटात सिरियन नागरिक मारले गेल्याचे म्हटले आहे. पण ठार झालेल्यांमध्ये नागरिक तसेच सिरियातील तुर्कीसंलग्न बंडखोरांचाही समावेश असल्याचा दावा मानवाधिकार संघटनेने केला.

गेल्या दोन वर्षांपासून आफ्रिन भागावर तुर्कीच्या लष्कर तसेच तुर्की संलग्न बंडखोरांचे वर्चस्व होते. सिरियन लष्कर आणि कुर्द बंडखोरांना पिटाळून तुर्कीने या भागावर नियंत्रण मिळविले होते. त्यामुळे तुर्की संलग्न बंडखोरांना लक्ष्य करण्यासाठी हा स्फोट घडविल्याचा दावा केला जातो. तुर्कीने या हल्ल्यावर संताप व्यक्त केला आहे. सिरियातील ‘पिपल्स प्रोटेक्शन्स युनिट’ (वायपीजी) हा कुर्द बंडखोरांचा गट या हल्ल्यामागे असल्याचा ठपका तुर्कीने ठेवला आहे. तुर्कीने याआधीच ‘वायपीजी’ या कुर्द गटाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

दरम्यान, आफ्रिनमधील हल्ला तुर्कीने या भागात केलेल्या लष्करी कारवाईला प्रत्युत्तर असल्याची चर्चा आखाती माध्यमे करीत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने आवाहन केल्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून सिरियात संघर्षबंदी लागू करण्यात आली होती. पण चार दिवसांपूर्वी तुर्कीच्या लष्कर आणि तुर्किसंलग्न गटाने सिरियाच्या ईशान्येकडील भागात हल्ले चढविले होते. या हल्ल्यात मोठी जीवितहानी झाली नव्हती. तरी हा हल्ला चढवून तुर्कीने संघर्षबंदीचे उल्लंघन केल्याचे आरोप केले जात आहेत.

leave a reply