ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून सदस्यदेशांना १५ अब्ज डॉलर्सचे कर्ज

ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून सदस्यदेशांना १५ अब्ज डॉलर्सचे कर्ज

नवी दिल्ली – मंगळवारी ब्रिक्सचे सदस्य देश ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांच्या परराष्ट्रमंत्र्याची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक पार पडली. यावेळी ब्रिक्सच्या ‘न्यू डेव्हलपमेंट बँकेने कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळात ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी १५ अब्ज डॉलर्सचे कर्ज घोषित केले. हे कर्ज आर्थिक संकटाच्या काळात ब्रिक्स सदस्य देशांना अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्वास रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी व्यक्त केला. तसेच भारत कोरोनाव्हायरसच्या विरोधात देत असलेल्या लढ्याचे रशियाने कौतुक केले आहे. भारताने रशियाला केलेले वैद्यकीय सहाय्य आणि भारतात अडकलेल्या २०० रशियन नागरिकांना मायदेशी पाठविण्यासाठी भारताने केलेले सहकार्य यासाठी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यानी आभार मानले.

कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांच्या परराष्ट्रमंत्र्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर या बैठकीत सहभागी झाले. यावेळी कोरोनाव्हायरसचे संकट आणि उपाययोजनांसह जागतिक आणि प्रादेशिक मुद्यांवर चर्चा पार पडली. ब्रिक्स देश कोरोनाव्हायरसवरील लसीच्या निर्मितीसाठी संयुक्तरीत्या प्रयत्न करीत आहे, हे या निमित्ताने स्पष्ट झाले. कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे कित्येक जणांचा रोजगार बुडत असल्याची चिंता व्यक्त करून तसेच होऊ न देण्यासाठी सूक्ष्म आणि लघु उद्योगाना सहाय्य पुरविणे, ब्रिक्स देशांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यावेळी म्हणाले.

ब्रिक्सच्या बैठकीत भारताने कोरोनाव्हायरसच्या विरोधात केलेल्या उपाययोजनांचा विशेष उल्लेख झाला. भारताने जगभरातल्या प्रमुख देशांना केलेले वैद्यकीय सहाय्य, आरोग्य सेतु ॲपद्वारे पुढाकार , प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनांचा विशेष उल्लेख केला. भारताच्या पारंपरिक वैद्यकीय उपचार पद्धतीचा पुरस्कार करण्यासाठी ब्रिक्स देशांनी भारताला सहाय्य करावे, असे आवाहन परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी यावेळी केले.

leave a reply