रशियन पाणबुडी सिरियासाठी रवाना

मॉस्को – क्रुज् क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली रशियाची ‘रोस्तोव-ऑन-डॉन’ ही पाणबुडी सिरियासाठी रवाना झाली आहे. पाच वर्षांपूर्वी सिरियातील ‘आयएस’विरोधी मोहिमेत या पाणबुडीने मोठी कामगिरी बजावली होती. त्यामुळे सिरियातील विशेष मोहिमेसाठी सदर पाणबुडी निघाल्याची शक्यता पाश्चिमात्य माध्यमे वर्तवित आहेत.

रशियन वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ‘रोस्तोव-ऑन-डॉन’ या पाणबुडीने सोमवारी तुर्कीच्या बॉस्फोरसच्या आखातात प्रवेश केला आहे. त्यामुळे सदर पाणबुडी येत्या काही दिवसात सिरियाच्या सागरी क्षेत्रात प्रवेश करील व ‘तार्तुस’ बंदरात दाखल होईल. सिरियाच्या तार्तुसमध्ये रशियन नौदलाचे तळ असून इथे किमान १३ युद्धनौका तैनात असल्याचा दावा केला जातो. सदर बंदरात तैनात होणाऱ्या ‘रोस्तोव-ऑन-डॉन’ या पाणबुडीचा वेग ताशी २० सागरी मैल इतका असून ती ४५ दिवस पाण्याखाली राहू शकते.

या पाणबुडीच्या तैनातीबाबत रशियन संरक्षण मंत्रालयाने माहिती दिलेली नाही. पण ‘रोस्तोव-ऑन-डॉन’ या पाणबुडीची तैनाती म्हणजे रशियाने घेतलेला लक्षणीय निर्णय ठरतो. २०१५ साली सदर पाणबुडीने सिरियातील अलेप्पो, होम्स आणि हमा प्रांतातील ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर भीषण क्षेपणास्त्र हल्ले चढविले होते. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे जबर नुकसान झाले होते.

दरम्यान, २०१७ साली सिरिया आणि रशियात झालेल्या सहकार्य करारानुसार, अस्साद राजवटीने रशियाला ४९ वर्षांसाठी तार्तुस बंदर भाडेतत्वावर दिले आहे. या बंदरात रशियाच्या अतिप्रगत युद्धनौका आणि पाणबुड्या तैनात आहेत. रोस्तोव-ऑन-डॉन’ सारख्या ‘क्रस्नोदोर’ आणि ‘स्तारी ओस्कोल’ या दोन पाणबुड्या आधीपासून तार्तुस बंदरावर तैनात आहेत.

leave a reply