येमेनच्या मरिबमधील संघर्षात ४७ ठार

- सौदी व अरब देशांचे हवाई हल्ले

दुबई – येमेनच्या मरिब शहराचा ताबा मिळविण्यासाठी सौदी अरेबियाचे पाठबळ लाभलेले येमेनचे लष्कर आणि हौथी बंडखोर यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात ४७ जण ठार झाले. गेल्या तीन दिवसांपासून मरिबवर नियंत्रण मिळविण्यासाठीची भयंकर रक्तपात सुरू झाला असून यामध्ये १७० जण ठार झाले आहेत. मरिबमधील हा संघर्ष थांबला नाही तर लाखो विस्थापितांसमोर भयंकर समस्या खडी ठाकेल, असे संयुक्त राष्ट्रसंघाने बजावले आहे.

येमेनच्या उत्तरेकडील मरिब हा एक इंधनसंपन्न प्रदेश म्हणून ओळखला जातो. सदर प्रदेश येमेनमधील सौदीसमर्थक सरकारच्या ताब्यात आहे. म्हणून येमेनमधील या सर्वात महत्त्वाच्या शहराचा ताबा मिळविण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून हौथी बंडखोरांकडून हल्ले सुरू आहेत.

याआधीच हौथींनी राजधानी सना ताब्यात घेतले असून मरिबवरील ताबा हौथींच्या सामर्थ्यात वाढ करणारा ठरू शकतो. तर सदर प्रदेश हौथींच्या ताब्यात जाऊ नये, यासाठी सौदी अरेबिया आणि अरब मित्रदेशांनी हवाई हल्ल्यांद्वारे येमेनच्या लष्कराला सहाय्य सुरू केले आहे. गेल्या चोवीस तासात मरिब प्रांतात पेटलेल्या संघर्षात २० जवानांचा बळी गेला तर २७ हौथी बंडखोर ठार झाले. या संघर्षात येमेनचे लष्कर आणि हौथींनी तोफांचा वापर केला. याआधी शुक्रवारच्या संघर्षात ५३ तर शनिवारच्या संघर्षात ७० जण ठार झाले होते.

मरिबमधील कस्सारा, अल-मशजा आणि जबल मुराद शहरात मोठा संघर्ष सुरू असल्याच्या बातम्या समोर येते आहेत. या संघर्षात हौथी बंडखोरांची वाहने, रणगाडे आणि तोफा नष्ट केल्याचा दावा येमेनच्या लष्कराने केला आहे.

राजधानी सनापासून १२० किलोमीटर अंतरावर असलेल्या मरिबमधील या संघर्षावर गेल्या महिन्यातच संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली होती. येथील संघर्षात हौथींनी चढविलेल्या हल्ल्यांमध्ये निर्वासितांचा बळी गेला होता. गेल्या सहा वर्षांपासून येमेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे विस्थापित झालेल्या किमान २० लाख जणांनी मरिबमध्ये आश्रय घेतला आहे.

या विस्थापितांसाठी मरिबमध्ये १४० ठिकाणी शिबिरे उभारण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत, इंधनसंपन्न मरिबसाठीचा संघर्ष येथील विस्थापितांची समस्या अधिक गंभीर करील, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघ देत आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात सौदी अरेबियाने येमेनमधील संघर्ष थांबविण्यासाठी हौथी बंडखोरांना संघर्षबंदीचा प्रस्ताव दिला होता. पण हौथींनी हा प्रस्ताव धुडकावून सौदीवरील बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सचे हल्ले सुरू ठेवले आहेत. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनो हौथी बंडखोरांना दहशतवाद्यांच्या यादीतून काढून टाकून सौदीवरील दडपण वाढविले होते. त्यानंतर हौथी बंडखोरांच्या आक्रमकतेत अधिकाधिक वाढ होत चालली आहे.

दरदिवशी हौथींकडून सौदीची शहरे, विमानतळ, लष्करीतळ आणि इंधनप्रकल्पांवर हल्ले केले जातात. सौदीने हौथींचे हे हल्ले परतवून लावले आहेत. पण हौथींचा एखादा हल्ला जरी यशस्वी ठरला तरी त्यातून भयंकर दुर्घटना होऊ शकते. त्यानंतर हौथी बंडखोरांच्या विरोधातील सौदीचा संघर्ष अधिकच उग्र होण्याची दाट शक्यता आहे.

leave a reply