लोकशाहीवादी आंदोलन चिरडण्यासाठी म्यानमारच्या लष्कराने ७०० जणांचा बळी घेतला

यंगून – देशातील लोकनियुक्त सरकार उलथून सत्तेचा ताब्यात घेणार्‍या म्यानमारच्या लष्कराने गेल्या दोन महिन्यांमध्ये लोकशाहीवादी निदर्शकांवर केलेल्या कारवाईत ७०० हून अधिक जणांचा बळी गेला आहे. जुंटा राजवट निदर्शकांवरील लष्करी कारवाईपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. तर गेल्या आठवड्यात लष्कराच्या कारवाईत बळी गेलेल्या निदर्शकांचे मृतदेह घेण्यासाठी येणार्‍या कुटुंबियांकडून म्यानमारचे लष्कर पैसे उकळत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान, म्यानमारच्या जुंटा राजवटीवर कठोर निर्बंध लादण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये चीन आणि रशिया आडकाठी करीत असल्याचा आरोप युरोपिय महासंघाने केला आहे.

गेल्या शुक्रवारी म्यानमारच्या लष्कराने बागो शहरात केलेल्या कारवाईत ८२ निदर्शकांचा बळी गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण स्थानिक संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या कारवाईत दगावलेल्यांची संख्या याहूनही अधिक असल्याची चिंता व्यक्त केली आहे. कारण लष्कराने गोळीबारात ठार झालेल्या निदर्शकांचे मृतदेह येथील प्रार्थनास्थळ तसेच शाळेत जमा करून ठेवले आहेत. याशिवाय जखमी निदर्शकांना फरफटत नेऊन याच ठिकाणी कैद केले आहे. लष्कराने जखमींना वैद्यकीय सुविधा देण्याचेही नाकारले आहे.

म्यानमारच्या लष्कराने आत्तापर्यंत निदर्शकांवर असॉल्ट रायफल्स, रायफल ग्रेनेड्स, हँड ग्रेनेड्स तसेच हवाई हल्ल्यांचाही वापर केला आहे. लोकशाहीवादी निदर्शकांवर लष्करी कारवाई करून म्यानमारच्या जुंटा राजवटीने मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याची टीका होत आहे. याशिवाय या कारवाई बळी गेलेल्या निदर्शकांचे मृतदेह मिळविण्यासाठी लष्कराकडे येणार्‍या कुटुंबियांकडून पैसे उकळले जात आहेत. म्यानमारचे लष्कर एका मृतदेहासाठी सुमारे ८५ डॉलर्स उकळत असल्याचा आरोप बागो विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने केला आहे.

लोकशाहीवादी आंदोलन चिरडण्यासाठी लष्करी कारवाई करणार्‍या म्यानमारच्या जुंटा राजवटीवर कठोर निर्बंध लादणे गरजेचे आहे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय स्तरातून केली जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील म्यानमारच्या राजदूतांनी देखील ही मागणी उचलून धरली आहे. पण चीन व रशिया जुंटा राजवटीवरील लष्करी निर्बंधांना विरोध करीत असल्याचा आरोप युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी केला. चीन व रशियाचे म्यानमारबरोबर व्यापक लष्करी सहकार्य आहे. म्हणूनच हे दोन्ही देश म्यानमारवरील निर्बंधांना विरोध करीत असल्याची टीका बोरेल यांनी केली.

दरम्यान, म्यानमारमधील लोकशाहीच्या नेत्या आँग स्यॅन स्यू की यांच्यावर लष्कराने नवे आरोप ठेवले आहेत. त्याचबरोबर स्यू की यांना त्यांच्या वकिलांशी भेट घेण्याची परवानगीही लष्कराने नाकारली आहे. कुठल्याही परिस्थितीत स्यू की यांची व त्यांच्या सहकार्‍यांची सुटका होणार नाही, यासाठी म्यानमारच्या लष्कराचे प्रयत्न सुरू आहेत.

leave a reply